Home प्रशासन युवकांनी भडक पोस्ट टाळाव्यात – अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते

युवकांनी भडक पोस्ट टाळाव्यात – अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते

0
200

रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  दुर्गा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रावेर शहरात शांतता राखण्यासाठी व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी रावेर पोलिसांच्या वतीने शांतता समितीची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी युवकांना उद्देशून महत्त्वाचे आवाहन करताना सोशल मीडियावर भडकावू आणि द्वेषमूलक पोस्ट टाळण्याचे सांगितले. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, “एकदा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला की, त्या युवकाचे आयुष्य अंधारात जाते. त्यामुळे संयम आणि जबाबदारीने वागा.”

रावेरमधील कमलाबाई गर्ल्स हायस्कूल जिमखाना हॉलमध्ये ही बैठक पार पडली. आगामी दुर्गा उत्सवाचा शांततेत व उत्साहात साजरा होण्यासाठी पोलिस आणि नागरिकांनी एकत्र येऊन विचारमंथन केले. अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी युवकांच्या सोशल मीडियावरील भूमिकेवर विशेष भर दिला. त्यांनी सांगितले की, सध्याच्या घडीला सोशल मीडियावरील एक चुकीची पोस्टही कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण करू शकते. त्यामुळे युवकांनी अशा गोष्टींपासून दूर राहून समाजात सलोखा राखण्यास मदत करावी.

या बैठकीस उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल बडगुजर, पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, सहायक पोलिस निरीक्षक मिरा देशमुख यांच्यासह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अरुण शिंदे, माजी जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष महेमूद शेख, माजी नगरसेवक सादिक मेंबर, गयास शेख, नितीन पाटील, दिलीप कांबळे, डी. डी. वाणी, अशोक गायकवाड, अयुब खान यांच्यासह दुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि शांतता समितीतील हिंदू-मुस्लिम सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीदरम्यान सर्वधर्मीयांनी एकमुखाने शहरात शांतता आणि ऐक्य कायम ठेवण्याची ग्वाही दिली. उत्सव काळात पोलिसांना पूर्ण सहकार्य केले जाईल, असे मंडळाच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले. पोलिस पाटील यांचाही या बैठकीला सक्रिय सहभाग होता. बैठकीचे सूत्रसंचालन पोलिस उपनिरीक्षक मनोज महाजन यांनी केले.

या बैठकीमुळे नागरिकांमध्ये सामाजिक सलोखा राखण्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून, रावेर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस आणि नागरिक सज्ज असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.


Protected Content

Play sound