Home प्रशासन तहसील भुसावळमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्व-अभियानाचा भव्य प्रारंभ

भुसावळमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्व-अभियानाचा भव्य प्रारंभ

0
153

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शावर आधारित ‘स्व-अभियान’ाचा प्रारंभ भुसावळ शहरात उत्साहात झाला. लोणारी मंगल कार्यालयात आयोजित उद्घाटन सोहळ्यात शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून शासन आणि प्रशासन यांच्यातील समन्वय साधत नागरिकांपर्यंत थेट सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार नीता लबडे, डीवायएसपी संदीप गावित यांच्यासह विविध शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज स्व-अभियानाचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, “सरकारच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणे आवश्यक असून, प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट हेच आहे. लाभार्थ्यांनी योजनांची माहिती घ्यावी आणि अधिकारी वर्गाने ती अंमलात आणण्यासाठी तत्पर राहावे.” त्यांनी स्व-अभियानाच्या माध्यमातून शासकीय यंत्रणा आणि जनतेमधील संवाद अधिक प्रभावी करण्याचे आवाहन केले.

राज्याचे मंत्री संजय सावकारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “प्रशासन जनतेसाठीच काम करत असते. कायदे तयार करणे हे शासनाचे काम असले, तरी त्या कायद्यांची योग्य अंमलबजावणी करणे हे अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. अशा अभियानांच्या माध्यमातून नागरिकांना थेट लाभ मिळतो, त्यामुळे प्रत्येकाने याचा उपयोग करून घ्यावा.”

कार्यक्रमादरम्यान बचत गट, श्रावण बाळ योजना, नगरपालिका यांसारख्या विविध योजनांचे लाभार्थी उपस्थित होते. त्यांच्या सन्मानार्थ प्रमाणपत्र वितरण करण्यात आले आणि त्यांच्या यशोगाथाही उपस्थितांसोबत शेअर करण्यात आल्या. या कार्यक्रमामुळे इतर नागरिकांनाही प्रेरणा मिळावी हा उद्देश ठेवण्यात आला होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार नीता लबडे यांनी केले. त्यांनी उपस्थितांचे स्वागत करून अभियानाची संकल्पना आणि उद्देश स्पष्ट केला. त्यांनी सांगितले की हा उपक्रम केवळ औपचारिकता नसून शासनाच्या योजनांना गती देण्याचा एक प्रभावी मंच आहे.

उद्घाटन समारंभाने भुसावळ शहरात शासन-प्रशासनाच्या एकत्रित प्रयत्नांचे दर्शन घडवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरु झालेल्या या स्व-अभियानामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये आत्मनिर्भरतेची भावना रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या उपक्रमातून अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळावा आणि प्रशासनाशी त्यांचा थेट संपर्क साधावा, ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


Protected Content

Play sound