Home Cities जळगाव सामाजिक कार्यकर्ते आणि कायदेतज्ञ यांची मानवधिकारावर चर्चा !

सामाजिक कार्यकर्ते आणि कायदेतज्ञ यांची मानवधिकारावर चर्चा !

0
152


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिविल राईट्स (APCR) च्या जळगाव चाप्टरने आज शहरात एक पत्रकार परिषद घेऊन जळगाव जिल्ह्यात वाढलेल्या सांप्रदायिक घटनांवर गंभीर चिंता व्यक्त केली. गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या या घटनांमुळे मानवाधिकार पायदळी तुडवले जात असून, सामाजिक सलोख्याला धोका निर्माण झाला आहे, असे मत ‘एपीसीआर’ने मांडले.

मान्यवरांनी केली सद्यस्थितीवर चर्चा
या पत्रकार परिषदेला माजी ज्येष्ठ कायदेतज्ञ जस्टिस कोळसे-पाटील, पुणे येथील वकील अॅड. संतोष जाधव, ‘एपीसीआर’ महाराष्ट्रचे सचिव शाकीर शेख, राज्यसचिव इनामदार आणि सामाजिक कार्यकर्त्या वासंती दिघे यांनी उपस्थित राहून पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी जिल्ह्यातील सद्यस्थितीवर प्रकाश टाकत, या घटनांमुळे समाजात निर्माण होत असलेल्या तणावाकडे लक्ष वेधले. समाजात शांतता आणि सद्भावना राखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

मानवाधिकार पायदळी तुडवले जात असल्याचा आरोप
‘एपीसीआर’ने आपल्या निवेदनात, या सांप्रदायिक घटनांमुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप केला. त्यांनी स्थानिक प्रशासनाला अशा घटनांना वेळीच आळा घालण्यासाठी आणि समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रभावी पावले उचलण्याचे आवाहन केले. शांतता आणि न्याय अबाधित राहण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे महत्त्वाचे आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

समाजाच्या सर्व स्तरांतून सहकार्याचे आवाहन
या गंभीर स्थितीवर मात करण्यासाठी समाजातील सर्व स्तरांतील लोकांनी आणि राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन ‘एपीसीआर’ने केले. या पत्रकार परिषदेमुळे जिल्ह्यातील सांप्रदायिक सलोख्याच्या मुद्द्याला अधिक महत्त्व मिळाले आहे आणि प्रशासनावर योग्य पावले उचलण्यासाठी दबाव निर्माण झाला आहे.


Protected Content

Play sound