Home Cities अमळनेर शहापूर रस्त्यावरील काटेरी झुडपे हटवण्यास सुरूवात; Live ट्रेंड्सच्या पाठपुराव्याला यश

शहापूर रस्त्यावरील काटेरी झुडपे हटवण्यास सुरूवात; Live ट्रेंड्सच्या पाठपुराव्याला यश

0
198


अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कळमसरे-शहापूर मार्गावरील दीर्घकाळ उपेक्षित राहिलेल्या काटेरी झुडपांचे अतिक्रमण अखेर हटवण्यास सुरुवात झाली आहे. स्थानिक नागरिक व शेतकरी यांच्यासाठी त्रासदायक ठरलेल्या या समस्येची गंभीर दखल “Live ट्रेंड्स न्यूज”ने सातत्याने घेतल्यानंतर, ठेकेदाराने तातडीने कारवाई सुरू करत रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे हटवण्याचे काम हाती घेतले आहे. परिणामी, शहापूर रस्त्याचा ‘कोंडलेला श्वास’ आता हळूहळू मोकळा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून कळमसरे ते शहापूर या सुमारे पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली होती. या रस्त्यावर विशेषतः कळमसरेपासून दोन किलोमीटर अंतरावर दोन्ही बाजूंनी काटेरी झुडपे इतकी वाढली होती की, वाहनचालकांना आणि पादचार्‍यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यातच पावसाळ्याच्या दिवसांत ही झुडपे अधिकच घनदाट होत असल्याने अपघाताचाही धोका वाढत होता. या समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने स्थानिकांमध्ये संताप निर्माण झाला होता.

“Live ट्रेंड्स न्यूज”ने या समस्येची पत्रकारितेच्या माध्यमातून वारंवार व जाणीवपूर्वक दखल घेतली. या वृत्तसंदर्भात स्थानिकांच्या भावना, समस्या आणि संतप्त प्रतिक्रिया सातत्याने अधोरेखित करण्यात आल्या. याचा सकारात्मक परिणाम म्हणून अखेर ठेकेदाराने काटेरी झुडपांचे अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली असून, गेल्या चार-पाच दिवसांपासून हे काम सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. अनेकांनी “देर आयी पर दुरुस्त आयी” या उक्तीचा आधार घेत समाधान व्यक्त करत “Live ट्रेंड्स न्यूज”च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल आभारही मानले आहेत. या झुडपांमुळे केवळ वाहतूकच अडथळलेली नव्हती, तर या मार्गावरून प्रवास करणंही धोकादायक झालं होतं. शेतकरी वर्गाने वेळोवेळी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष प्रवास करून दाखवण्याचे आव्हानही दिले होते.

दरम्यान, केवळ झुडपे हटवण्यापुरतेच नव्हे तर या रस्त्याचे लवकरच डांबरीकरण होणार असल्याची माहितीही समोर आली आहे. याबाबत इंजिनिअर कौस्तुभ पाटील यांनी “Live ट्रेंड्स”शी बोलताना सांगितले की, “रस्त्याचे काम पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत करण्यात येणार असून, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात वर्क ऑर्डर मिळताच हे काम युद्धपातळीवर सुरू होईल.” आमदार अनिल पाटील यांनीही या रस्त्यासाठी वेळोवेळी सूचना दिल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

या संपूर्ण प्रकरणातून स्पष्ट होते की, योग्य माध्यमांचा प्रभावी वापर आणि जनतेच्या प्रश्नांची सातत्याने दखल घेतल्यास प्रशासनाला कृती करण्यास भाग पाडता येते. शहापूर रस्त्यावर सुरू झालेली ही सुधारणा म्हणजे माध्यमशक्तीच्या सकारात्मक परिणामाचे ज्वलंत उदाहरण आहे.


Protected Content

Play sound