अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या कळमसरे ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक टप्पा गाठत आयएसओ मानांकन मिळवले आहे. ग्रामविकास विभागाच्या वतीने अमळनेर येथील इंदिरा भवन सभागृहात आयोजित मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान कार्यशाळेत या मानांकनाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. हे प्रमाणपत्र मा. नगराध्यक्ष तथा जि.प. सदस्य जयश्री पाटील आणि गटविकास अधिकारी एन. आर. पाटील यांच्या हस्ते सरपंच जगदीश निकम, उपसरपंच जितेंद्रसिंह पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिनकर चव्हाण आणि ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानेश्वर पाटील यांना देण्यात आले.
कळमसरे ग्रामपंचायतीने समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत केलेल्या बहुआयामी कार्यामुळे हे मानांकन प्राप्त झाले आहे. गावठाण जागेवर वृक्षलागवड, सिंचनासाठी पाणी उपलब्ध करणे, शुद्ध पेयजलाचा नियमित पुरवठा, स्वच्छता अभियान, ग्रामपंचायत कर संकलनात नागरिकांचा सहभाग, सर्व शासकीय दाखले व उतारे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देणे, कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता राखणे, शासकीय योजनांचा लाभ घराघरात पोहोचविणे, मनरेगा अंतर्गत कामे प्रभावीपणे राबविणे, शौचालय बांधकाम, कुपोषित बालकांना पोषक आहार देणे, दिव्यांग व मागासवर्गीयांसाठी निधी वितरण, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात विशेष कामगिरी या सर्व निकषांवर कळमसरे ग्रामपंचायतीने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.

या कामगिरीबद्दल सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी एकमुखाने सांगितले की, ही फक्त मान्यता नाही, तर आगामी काळात अधिक चांगली कामगिरी करण्यासाठीची जबाबदारीही आहे. गावातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग आणि स्थानिक प्रशासनाची कटिबद्धता यामुळेच हा सन्मान शक्य झाला आहे.
कार्यक्रमावेळी महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भदाणे, जिल्हा परिषदेचे उप अभियंता डी. डी. पाटील, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी कळमसरे ग्रामपंचायतीच्या कामाचे कौतुक करत, इतर ग्रामपंचायतींसाठी ती प्रेरणास्थान असल्याचे नमूद केले.



