यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्य शासनाच्या निर्देशानुसार यावल तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने १७ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवाडा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्या थेट आणि टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याबाबतची माहिती यावलचे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यभरात राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाची अंमलबजावणी यावल तालुक्यातही जोरात होणार आहे. या काळात महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांचे विविध प्रकारचे महसुली प्रश्न सोडवण्यासाठी विशेष पद्धतीने काम करतील. सेवा पंधरवाडा हा तीन टप्प्यात विभागण्यात आला असून, पहिला टप्पा १७ ते २१ सप्टेंबर, दुसरा २२ ते २६ सप्टेंबर आणि तिसरा टप्पा २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत असणार आहे.

या उपक्रमाचा प्रारंभ थकबाकी मुक्ती मोहिमेपासून होणार असून, विशेषतः १,००० रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या सुमारे १,३०० थकबाकीदारांची प्रकरणे लोक अदालतीत मांडण्यात येणार आहेत. संबंधित थकबाकीदारांना आधीच नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. महसूल वसुलीसोबतच वारस नोंदणी, मृतांची नावे वगळणे, स्त्रियांचे हक्क, अपात्र लाभार्थ्यांची नावं वगळणे, तसेच पात्रांची नोंद करणे या कामांवर भर दिला जाणार आहे.
तहसील कार्यालयात विविध योजनांशी संबंधित अर्ज प्रक्रियेचा वेग वाढवून शेतकऱ्यांना सातबारा उतारा अद्ययावत करून देणे, तुकडे बंदी कायद्यांतर्गत सुनावण्या घेणे, तसेच ‘शेत सुलभ योजना’अंतर्गत अडथळे दूर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पानंद रस्ते आणि गाव शिवारातील जुन्या रस्त्यांचे सीमांकन करून त्यांना खुलं करण्यात महसूल कर्मचारी, गावचे पोलीस पाटील आणि महसूल सेवक सहभागी होतील. ८ ते १६ सप्टेंबरदरम्यान गावशिवार भेटीही घेण्यात येणार आहेत.
तालुक्यातील दफनभूमी आणि स्मशानभूमींमधील अतिक्रमण हटवण्याचे आणि डोंगरकठोरा येथील स्मशानभूमीमध्ये नवीन बांधकाम करण्याचा प्रस्तावही या काळात सादर केला जाईल. याशिवाय, १७ सप्टेंबर रोजी चिखली बुद्रुक येथे ‘महासमाधान शिबिर’ आयोजित करण्यात येणार आहे, जेथे नागरिकांना थेट सेवा आणि मार्गदर्शन मिळणार आहे.
शेतकरी आत्महत्या कुटुंबीयांना मदतीचा हात देणे, त्यांच्या समस्या समजून घेऊन उपाययोजना करणे, महाविद्यालयांमध्ये शिबिरे घेऊन विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले वितरित करणे, तसेच सामाजिक अर्थसहाय योजनेंतर्गत प्रलंबित प्रकरणांवर निर्णय घेणे अशा उपक्रमांचाही समावेश सेवा पंधरवाड्यात असणार आहे. या माध्यमातून नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित समस्या मार्गी लागतील, असा विश्वास तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेस तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.



