धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र शासनाने २ सप्टेंबर रोजी काढलेला शासन निर्णय (जीआर) तात्काळ रद्द करावा, या मागणीसाठी ओबीसी समाजाने जोरदार आंदोलन केली. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नेतृत्वाखाली ओबीसी बांधवांनी गुरूवारी ११ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता धरणगाव तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन सादर केले. ओबीसी समाजात आधीच साडेतीनशेहून अधिक जाती आहेत. या जातींना अद्याप पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं नाही. त्यात मराठा समाजाचा समावेश केल्यास ओबीसींवर मोठा अन्याय होईल, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. यामुळे मराठा आणि ओबीसी समाजातील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, ‘सगेसोयरे’ किंवा सरसकट मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करणे हा आरक्षणाचा योग्य निकष नाही. भारतीय राज्यघटनेनुसार आरक्षणासाठी ‘सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास’ हाच निकष आहे. मराठा समाज या निकषात बसत नाही, असं ओबीसी बांधवांचं म्हणणं आहे. त्यामुळे हा जीआर तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. ओबीसी समाजाच्या हिताचा विचार करून, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं, असं आवाहनही त्यांनी शासनाला केलं आहे.

मोठ्या संख्येने ओबीसी बांधवांची उपस्थिती
या आंदोलनात मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव सहभागी झाले होते. महेंद्र महाजन, ज्ञानेश्वर महाजन, गुलाबराव वाघ, निलेश चौधरी, कैलास माडी, गोरख देशमुख, रामकृष्ण चौधरी, विजय चौधरी, यशवंत वराडे, सुभाष माळी आणि सुखदेव महाजन यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.



