Home क्रीडा जिल्हास्तर फुटबॉल स्पर्धेत गोदावरी स्कूलचा झळाळता विजय; १४ वर्षाखालील मुलींच्या संघाचे रोप्य...

जिल्हास्तर फुटबॉल स्पर्धेत गोदावरी स्कूलचा झळाळता विजय; १४ वर्षाखालील मुलींच्या संघाचे रोप्य पदक

0
125

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथे ९ सप्टेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या जिल्हास्तर फुटबॉल क्रीडा स्पर्धेत गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या १४ वर्षाखालील मुलींच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपविजेतेपद पटकावले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे गोदावरी स्कूलने रोप्य पदक आपल्या नावे करत जिल्ह्यात आपली छाप सोडली आहे.

ही स्पर्धा गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडली. स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांतील संघ सहभागी झाले होते. या कठीण स्पर्धेत गोदावरी स्कूलच्या मुलींच्या संघाने संघशक्ती, खेळातील कौशल्य आणि आत्मविश्वास यांचा सुरेख संगम साधत उपविजेतेपद मिळवले. संघातील खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धा काळात उत्कृष्ठ सादरीकरण करत विरोधी संघांना चांगली टक्कर दिली.

या यशामध्ये मार्गदर्शक ममता प्रजापत, मयूर पाटील आणि उदय फालक यांचे मोलाचे योगदान असून त्यांनी खेळाडूंना सरावाच्या काळात शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या सक्षम बनवले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच संघाने मैदानात आत्मविश्वासाने खेळ करत यश मिळवले. या विजयाचा आनंद संपूर्ण गोदावरी फाउंडेशनमध्ये साजरा करण्यात आला.

शाळेच्या या यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील आणि हृदयरोगतज्ज्ञ डॉ. वैभव पाटील यांनी खेळाडूंचे विशेष अभिनंदन केले. तसेच, शाळेच्या प्राचार्या सौ. नीलिमा चौधरी, शिक्षकवर्ग आणि क्रीडा प्रशिक्षकांनी या संपूर्ण संघाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


Protected Content

Play sound