बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील ग्रामपंचायतीच्या कारभारात मोठी अनियमितता झाल्याचे समोर आले आहे. ग्रामसभा फक्त कागदोपत्रीच दाखविण्यात आल्याचा गंभीर आरोप करत गावकऱ्यांनी थेट ‘आपले सरकार’ पोर्टलवर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेत बोदवड येथील विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) यांना चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची सखोल चौकशी होणार असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
नियमांचे उल्लंघन, गावकऱ्यांच्या नावाने खोटे ठराव
ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार प्रत्येक ग्रामपंचायतीला वर्षातून किमान चार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. मात्र, शिरसाळा ग्रामपंचायतीत या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. मागील अनेक ग्रामसभा कागदावरच दाखवून त्यांचे ठराव मंजूर केले गेल्याचे समोर आले आहे. एका ग्रामपंचायत सदस्याने नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले की, मागील ग्रामसभांचे प्रोसिडिंग वाचले असता, गावातील एका व्यक्तीचे नाव (राजू गुलाब पारधी) अनुमोदक म्हणून नमूद केले होते. विशेष म्हणजे, ज्या व्यक्तीला याबद्दल काहीच माहिती नव्हते, त्याचे नाव वापरण्यात आले. तसेच, बाहेरगावी असलेल्या व्यक्तीला सूचक म्हणून दाखवून फसवणूक केल्याचेही उघड झाले आहे.

ग्रामसेवकाकडून उडवाउडवीची उत्तरे
हा प्रकार समोर आल्यानंतर गावातील नागरिक आक्रमक झाले. त्यांनी ऑगस्ट महिन्याची ग्रामसभा २० तारखेला घेण्याचा आग्रह धरला. ग्रामसेवक यांनी ती सभा घेतली, परंतु त्यात मागील प्रोसिडिंग वाचून दाखवले नाही. गावातील कामांबाबत विचारले असता, समाधानकारक उत्तर मिळाले नाही आणि ती सभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर २५ तारखेला दवंडी देऊन २६ तारखेला पुन्हा सभा घेण्यात आली. त्यावेळी मागील प्रोसिडिंग वाचून दाखवले. राजू पारधी यांचे नाव अनुमोदक म्हणून आढळल्याने त्यांनी ग्रामसेवकांना जाब विचारला. ‘आम्ही कधी ग्रामसभेला आलोच नाही, तर आमचे नाव कसे टाकले?’ असा प्रश्न विचारला असता, ग्रामसेवकांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने गावकऱ्यांची खात्री झाली की, हा सर्व प्रकार कागदोपत्रीच सुरू आहे.
काम नसतानाही बिलांची उचल
या ग्रामसभेत केवळ ग्रामसभांच्या अनियमिततेचाच नव्हे, तर गावातील विकासकामांच्या बोगस बिलांचा मुद्दाही गावकऱ्यांनी उपस्थित केला. गटार साफ करण्याचे काम न करताच बिले काढण्यात आल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, सार्वजनिक शौचालयांवर टाक्याच नसल्याचे गावकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. ‘जर संडासवर टाक्याच नाहीत, तर त्या गेल्या कुठे?’ असा थेट प्रश्न त्यांनी विचारला. यामुळे ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट होत आहे. या सर्व प्रकरणी गावकऱ्यांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवर तक्रार दाखल केली असून, आता विस्तार अधिकारी नेमकी काय चौकशी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



