Home Uncategorized वनोली शिवारात मोरांची शिकार करणारे दोघे अटकेत 

वनोली शिवारात मोरांची शिकार करणारे दोघे अटकेत 

0
151

फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील वनोली शिवारात वनविभागाच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत दोन संशयित शिकाऱ्यांना रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईत तब्बल ५ मृत मोर, एअर रायफल, चाकू, टॉर्च व मोटरसायकल असा सगळा शिकार साहित्य जप्त करण्यात आला असून, आरोपींना न्यायालयाने ३ दिवसांची वन कोठडी सुनावली आहे.

दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास वनपाल फैजपूर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे फैजपूर राऊंड स्टाफ व इतर वनकर्मचाऱ्यांनी वनोली शिवारात सापळा रचून दबा धरला होता. काही वेळातच बंदुकीच्या गोळीबाराचा आवाज ऐकू आला. त्यानंतर घटनास्थळी धाव घेतली असता दोन व्यक्ती संशयास्पदरीत्या हालचाल करताना आढळले. तत्काळ कारवाई करत दोघांनाही पकडण्यात आले.

पकडण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे सलीम रुबाब तडवी व सय्यद अफसर अली मुशताक अली, दोघेही राहणार मारूळ (ता. यावल) अशी आहेत. दोघांनी गोळीबार केल्याचे स्वतः कबूल केले असून, त्यांच्याकडे एक एअर रायफल, दोन चाकू, टॉर्च, एक मोटरसायकल तसेच एका पोत्यात ५ मृत मोर सापडले आहेत. हे साहित्य व मृत पक्षी जप्त करण्यात आले.

या घटनेवरून गुन्हा वनरक्षक बोरखेडा बु. यांच्या तक्रारीवरून वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत कलम 2(16), 2(20), 2(36), 9, 39 व 48अ नुसार प्र.रि.क्र. 05/2025 दि. 01/09/2025 नुसार नोंदविण्यात आला आहे. आरोपींना आज दि. 1 सप्टेंबर 2025 रोजी यावल न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने 3 दिवसांची वन कोठडी सुनावली.

ही कारवाई मा. वनसंरक्षक धुळे श्रीमती निनू सोमराज, उपवनसंरक्षक यावल श्री. जमीर शेख, विभागीय वनाधिकारी (दक्षता) श्री. राजेंद्र सदगीर, सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील, तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पूर्व श्री. स्वप्नील फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईदरम्यान वनपाल फैजपूर व त्यांच्या राउंड स्टाफने विशेष दक्षता घेतली.

या प्रकरणाचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पूर्व हे करत आहेत. राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांची शिकार करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता असून, या घटनेमुळे वन्यजीव संरक्षणाविषयी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound