मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटलांचे सुरू असलेले उपोषण आता चिघळू लागले असून आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी मोठी घडामोड घडली आहे. मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला आणखी एक दिवसाची परवानगी दिल्याने उद्याही आंदोलन सुरू राहणार आहे. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, वातावरण चांगलेच तापले आहे.
मुंबई पोलिसांनी याआधी आज सायंकाळपर्यंतच आंदोलनास परवानगी दिली होती, मात्र परिस्थितीचा अंदाज घेता पोलिसांनी ही मुदत उद्यापर्यंत वाढवली आहे. त्यामुळे आता उद्या देखील मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आपल्या मागण्यांसाठी उपोषण करत राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर QRT, RAF व इतर विशेष पोलीस पथकांची तैनाती केली आहे. सोमवारी देखील या आंदोलनाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक असणार आहे.

आज मुंबईत सुरू झालेल्या पावसामुळे आंदोलक मोठ्या प्रमाणावर सीएसएमटी स्थानकात दाखल झाले. यामुळे स्थानकात प्रचंड गर्दी झाली असून, प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाच्या थेंबांत आंदोलकांचा जल्लोष सुरू असून, अनेक आंदोलक सीएसएमटी परिसरात नाचताना आणि घोषणा देताना दिसून आले.
आझाद मैदानावर खासदार सुप्रिया सुळे यांनी जरांगे पाटलांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपोषणामुळे तब्येत खालावल्याने त्यांनी सुळेंशी संवाद साधण्याचे टाळले. डॉक्टरांचा गट त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. सुप्रिया सुळे यांना भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, “जरांगे पाटलांनी चार दिवसांपासून काहीही खाल्लेले नाही, त्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत आहे.”
दरम्यान, सुप्रिया सुळे मैदानातून बाहेर पडताना काही आंदोलकांनी त्यांना घेराव घातला. “एक मराठा, लाख मराठा” अशा घोषणा देण्यात आल्या. त्याचबरोबर काही आंदोलकांनी शरद पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी करत, त्यांच्या गाडीचा पाठलाग केला. काही आंदोलकांनी बॉटलही फेकल्याचा प्रकार घडला. एका आंदोलकाने शरद पवारांवर मराठा समाजाचे वाटोळे केल्याचा थेट आरोप केला.
या साऱ्या घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी टीव्ही नाईन मराठीशी बोलताना सांगितले की, “कोणतेही नेते जेव्हा अशा ठिकाणी भेटीस येतात, त्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळावी. बॉटल फेकणे, घोषणाबाजी करणे हे अयोग्य आहे. अशा प्रकारांनी काहीही साध्य होणार नाही.” तसेच मराठा समाजासाठी सरकारने आरक्षण दिले असून, त्याचा लाभ मराठा समाजातील लोक घेत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.



