जळगाव– लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील भोकर येथील ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांच्या आत्मनिर्भरतेला चालना देण्यासाठी भोकर (ता. जळगाव) येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत भव्य बँक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या विशेष मेळाव्यात कानळदा-भोकर प्रभागातील एकूण २९ महिला स्वयंसहायता समूहांना २ कोटी १० लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले, ज्यामुळे महिलांना त्यांच्या छोट्या व्यवसायांना भक्कम आर्थिक आधार मिळणार आहे.
या बँक मेळाव्यास ग्रामपंचायत भोकरच्या सरपंच प्रमिलाबाई नंदलाल सोनावणे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी तालुका अभियान व्यवस्थापक रविंद्र सूर्यवंशी, एसबीआय भोकर शाखा व्यवस्थापक जयेश राणे, तसेच उमेद अभियानाचे प्रभाग समन्वयक स्वप्निल पाटील यांच्या हस्ते महिलांना धनादेशांचे वितरण करण्यात आले.

कर्जवाटप झाल्यानंतर महिला सदस्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले. अनेक महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना, “आमच्या व्यवसायाच्या सुरुवातीसाठी आणि विस्तारासाठी हे कर्ज खूप उपयोगी ठरेल,” असे सांगितले. काही महिला गटांनी हातमाग व्यवसाय, दुग्धव्यवसाय, किरकोळ विक्री व अन्न प्रक्रिया क्षेत्रात पुढे जाण्याचा निर्धार केला आहे.
उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या मेहनती आणि जिद्दीचे कौतुक करताना, अशा उपक्रमांमुळे केवळ महिलांचे सबलीकरण होत नाही, तर गावपातळीवर रोजगारनिर्मिती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते, असे सांगितले. ग्रामविकासासाठी महिला गटांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या मेळाव्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण प्रभागातील २९ स्वयंसहायता समूहांचे अध्यक्ष, सचिव आणि सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग. महिलांनी पारंपरिक पेहरावात आणि उत्साही वातावरणात उपस्थित राहून या कार्यक्रमाला उत्सवाचे स्वरूप दिले. बँक आणि उमेद अभियान यांच्या सहकार्यामुळे अशा प्रकारचा उपक्रम खऱ्या अर्थाने ग्रामीण विकासासाठी दिशादर्शक ठरत आहे.



