
मुंबई-वृत्तसेवा । मराठा समाजबांधवांना आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज लाखो समाजबांधवांसह मुंबईत दाखल झाले असून त्यांनी आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथून कुच केल्यानंतर त्यांचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. जरांगे यांना पाच हजार आंदोलकांसह आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली होती. तथापि, आज लक्षावधी मराठा समाजबांधव मुंबईत दाखल झाले आहेत. सकाळी दहा वाजेपासून जरांगे यांचे आमरण उपोषण सुरू केले आहे.
उपोषण सुरू करतांना जरांगे यांनी उपस्थितांना संबोधित करतांना आर-पारची लढाई सुरू झाल्याची घोषणा केली. ते म्हणाले की, गेल्या सत्तर वर्षांपासून मराठा समाजाच्या तोंडला पाने पुसण्यात आली आहेत. आता मात्र आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरणार नाही. मराठ्यांनी आज मुंबई जाम केली. त्याच प्रकारे समाजबांधवांनी दोन तासात मुंबई खाली करण्याचे आवाहन देखील त्यांनी याप्रसंगी केले. समाजबांधवांनी दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त करतांनाच त्यांनी बांधवांना परत जाण्याचे आवाहन केले. प्राण गेले तरी चालतील, मात्र समाजाला आरक्षण मिळवून देणारच अशी गर्जना देखील जरांगे यांनी याप्रसंगी केली.
तर, दुसरीकडे आज पहाटेच असंख्य मराठा समाजबांधव आज मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत सर्वत्र भगवा जनसागर उसळल्याचे दिसून येत आहे. तर राज्य सरकार जरांगे यांच्या उपोषणावर काय उपाययोजना करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



