Home पर्यावरण वैष्णोदेवी भूस्खलनात ३० भाविकांचा मृत्यू; बचावकार्य सुरू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

वैष्णोदेवी भूस्खलनात ३० भाविकांचा मृत्यू; बचावकार्य सुरू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती


जम्मू-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। जम्मू-काश्मीरमध्ये मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कहर पुन्हा एकदा समोर आला आहे. प्रसिद्ध वैष्णोदेवी यात्रेच्या मार्गावर अर्धकुंवारीजवळ मंगळवारी झालेल्या भीषण भूस्खलनात आतापर्यंत ३० भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अनेकजण जखमी असून, काहीजण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

रियासी जिल्ह्याचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक परमवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कटरा येथील वैष्णोदेवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर अर्धकुंवारीजवळ इंद्रप्रस्थ भोजनालयाच्या आसपास हे भूस्खलन झाले. या दुर्घटनेचा फटका यात्रेकरूंना मोठ्या प्रमाणात बसला असून, आतापर्यंत ३० जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अनेक यात्रेकरू जखमी असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस, जिल्हा प्रशासन आणि भारतीय लष्कराचे जवान घटनास्थळी उपस्थित असून बचावकार्य सुरू आहे.

गेल्या २४ तासांत जम्मू शहरात तब्बल २५० मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे संपूर्ण भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते, पूल आणि घरे पाण्याखाली गेली असून अनेक ठिकाणी भूस्खलनाचे प्रकार घडले आहेत. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. प्रशासनाने आतापर्यंत ३५०० हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले असून, आणखी काही ठिकाणी मदतकार्य सुरू आहे.

हवामान विभागाने पुढील ४८ तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू विभागातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, उत्तर रेल्वेने जम्मू आणि आसपासच्या भागात जाणाऱ्या २२ गाड्या रद्द केल्या असून २७ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या घटनेनंतर वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली असून भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भूस्खलनामुळे यात्रा मार्गाचे मोठे नुकसान झाले असून त्याच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.


Protected Content

Play sound