जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग तसेच कला व मानवविद्या प्रशाळेच्या संयुक्त विद्यमाने ‘भविष्यातील युद्धे आणि युद्धपद्धती’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यान मंगळवार, १९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत विद्यापीठाच्या अधीसभा सभागृहात संपन्न होणार आहे. विद्यार्थ्यांसह प्राध्यापकवर्ग आणि अभ्यासकांसाठी ही एक नामवंत लष्करी अधिकारीकडून मार्गदर्शन घेण्याची अनोखी संधी ठरणार आहे.
या विशेष व्याख्यानासाठी भारतीय लष्करातून सेवानिवृत्त झालेले लेफ्टनंट जनरल विनोद जी. खंडारे प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या लष्करी सेवेला चार दशके उलटले असून या काळात त्यांनी जम्मू-काश्मीर, लडाख, ईशान्य भारत आणि सीमावर्ती भागात कार्यरत राहून संवेदनशील परिस्थिती हाताळण्याचा दांडगा अनुभव मिळवला आहे. भारतीय लष्करातील नेतृत्व, युद्ध रणनीती आणि राष्ट्रीय सुरक्षा धोरणांत त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. ते राष्ट्रीय सुरक्षा परिषदेमध्ये वरिष्ठ लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते आणि संरक्षण मंत्रालयात तांत्रिक नवप्रयोगांसंदर्भात सल्ला देणारी महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली आहे.

त्यांच्या व्याख्यानात भविष्यातील युद्धात वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा — जसे की कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ड्रोन तंत्रज्ञान, सायबर हल्ले, माहिती युद्ध — आणि भारताच्या समोर उभ्या राहणाऱ्या सुरक्षाविषयक आव्हानांचा सखोल ऊहापोह केला जाणार आहे. आधुनिक युद्धांची दिशा आणि पद्धती कशा झपाट्याने बदलत आहेत, याची जाणीव करून देतानाच त्यांनी देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या धोरणात्मक सुधारणा व उपाययोजनांचाही मागोवा घेणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विजय एल. माहेश्वरी हे राहणार असून त्यांनी विद्यापीठात अशा प्रकारचे व्याख्यान आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उपक्रमाचे स्वागत केले आहे. विद्यार्थ्यांनी या व्याख्यानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कला व मानवविद्या प्रशाळेचे संचालक प्रा. राम भावसार यांनी केले आहे.
हा कार्यक्रम केवळ माहितीपर न राहता प्रेरणादायी ठरणार असून, नव्या पिढीला बदलत्या युद्धसंधर्भातील ज्ञानाची खोल समज देईल. विद्यार्थ्यांनी यातून आत्मविश्वास, जागरूकता आणि समकालीन धोरणांचा वेध घेण्याची संधी मिळवावी, असे आयोजकांनी नमूद केले आहे.



