
पहूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर शहरातील पत्रकार संघटनेच्या नव्या कार्यकारिणीची निवड नुकतीच शांत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. यामध्ये डॉ. संभाजी क्षीरसागर यांची संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी पुन्हा एकदा जयंत जोशी यांची निवड झाली असून, सचिवपदी शहरातील प्रथम महिला पत्रकार सौ. गीता भामेरे यांची निवड होऊन पत्रकार संघटनेच्या नेतृत्वात नव्या दमाचा शिरकाव झाला आहे.

स्वातंत्र्यदिनी सकाळी ११ वाजता पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत सभागृहात ज्येष्ठ पत्रकार शरद बेलपत्रे यांच्या अध्यक्षतेखाली सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ज्येष्ठ पत्रकार शांताराम लाठे हेही उपस्थित होते. प्रारंभी देशासाठी प्राण अर्पण केलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
निवड प्रक्रियेवेळी मावळते अध्यक्ष रवींद्र लाठे यांनी आपल्या कार्यकाळातील आठवणी शेअर करताना भावुक होत, रक्तदान शिबिर, पत्रकारांसाठी हेल्मेट वाटप अशा उपक्रमांची माहिती दिली. उपाध्यक्षपदी जयंत जोशी यांची फेरनिवड करण्यात आली असून, सचिवपदी सौ. गीता भामेरे यांची निवड ही विशेष उल्लेखनीय ठरली आहे. गीता भामेरे या पहूर शहरातील पहिल्या महिला पत्रकार म्हणून ओळखल्या जातात.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा स्नेहवस्त्र व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. तसेच पत्रकार संघटनेत नव्याने सहभागी झालेल्या ईश्वर हिवाळे यांचे विशेष स्वागत करण्यात आले. यावेळी आगामी काळात संघटनेने कोणत्या दिशा ठरवाव्यात यावरही सखोल चर्चा झाली.
याप्रसंगी बोलताना शरद बेलपत्रे यांनी सांगितले की, पत्रकार हा समाजाच्या हितासाठीच लिहित असतो, त्यामुळे पत्रकारांनी निर्भीडपणे सत्य लेखन करत राहावे. कोणताही अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्तंभलेखक शंकर भामेरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन माजी अध्यक्ष रवींद्र घोलप यांनी केले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे शहरातून सर्वत्र अभिनंदन करण्यात येत असून, संघटनेच्या नव्या कार्यकारिणीकडून कार्यक्षमतेची आणि पत्रकारांच्या हिताची अपेक्षा व्यक्त होत आहे.



