Home धर्म-समाज ठाण्यात पहिल्यांदाच १० थरांची दहीहंडी रचून विश्वविक्रम

ठाण्यात पहिल्यांदाच १० थरांची दहीहंडी रचून विश्वविक्रम


ठाणे-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । मुंबई आणि ठाणे परिसरात श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर दहीहंडी उत्सवाचा रंगतदार थरार सुरु असून, यंदाचा सोहळा ऐतिहासिक ठरला आहे. जोगेश्वरी येथील कोकण नगर गोविंदा पथकाने ठाण्यात भरवण्यात आलेल्या ‘संस्कृती दहीहंडी’त तब्बल १० थर रचून पहिला जागतिक विक्रम केला आहे. या पराक्रमाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले असून, गोविंदांच्या एकतेचे व आत्मविश्वासाचे दर्शन घडवले आहे.

शिवसेना शिंदे गटाचे नेते व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली भरवण्यात आलेल्या ‘संस्कृती दहीहंडी’ कार्यक्रमात या विक्रमी मनोऱ्याची नोंद झाली. दोन महिन्यांच्या प्रचंड मेहनतीनंतर, कोकण नगर गोविंदा पथकाने अखेर दहा थरांचे मनोरे यशस्वीरित्या रचले. यामध्ये सुमारे ५५० गोविंदांनी सहभाग घेतला होता. प्रशिक्षक विवेक कोचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अपघात टाळून हा विक्रम साधला.

विशाल कोचरेकर या पथकातील गोविंदाने सांगितले की, “२०२२ मध्ये आम्ही याच मैदानात ९ थरांचा विक्रम केला होता, त्यानंतर यंदा १० थर रचण्याचा निर्धार केला होता.” हा निर्धार पूर्ण करताच, मैदानात एकच जल्लोष झाला. मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी भावनिक होत कोकण नगरच्या पथकाचे कौतुक करत २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. “खऱ्या अर्थाने राष्ट्रभक्ती दाखवली आहे. तुम्ही मराठी माणसांची एकी सगळ्यांना दाखवून दिली आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

१० थरांची रचना यशस्वी झाल्यानंतर मंत्री सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक भावुक झाले. यावेळी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या स्पॅनिश पाहुण्यांनीही गोविंदांच्या खेळात रस घेत आनंद व्यक्त केला. यामुळे या सांस्कृतिक कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय स्वरूपही लाभले.

या ऐतिहासिक कामगिरीनंतर कोकण नगरच्या पथकाला सलामी देण्यासाठी आर्यन गोविंदा पथकाने ९ थरांची दहीहंडी साजरी केली. यंदाच्या कार्यक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत जनजागृती करण्यात आली होती, तर शोले चित्रपटाला ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विशेष मानवंदन देत शोलेच्या प्रतिकृतीही साकारण्यात आल्या होत्या.


Protected Content

Play sound