जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील घरकामगार आणि बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, त्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी बुधवारी १३ जुलै रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घरकाम कामगार युनियनच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कामगारांनी घोषणाबाजी करत जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर केले.
कामगार युनियनच्या प्रमुख मागण्यांमध्ये संसारोपयोगी भांडी वाटप करणे, मासिक मानधन १० हजार रुपये करणे याचा समावेश आहे. तसेच, बोगस कामगार नोंदणी थांबवून दोषींवर दंडात्मक कारवाई करण्याची आणि नवीन नोंदणी सध्या थांबवण्याची मागणीही करण्यात आली. यासोबतच, कामगारांच्या मुलांच्या शैक्षणिक योजनांचे लाभ त्वरित व पारदर्शकपणे वाटप करावेत, आणि कल्याणकारी मंडळाच्या वतीने मिळणारे शैक्षणिक व सामाजिक लाभ थेट बँक खात्यात वर्ग करावेत, अशी मागणीही युनियनने केली आहे. अनेक वर्षांपासून या मागण्या प्रलंबित असल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी आहे.

या निदर्शनांमुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. कामगार युनियनच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करून आपल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती केली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.



