
जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सोळाव्या शतकातील पराक्रमी आणि दूरदृष्टीसंपन्न गोंडवाना साम्राज्याच्या राणी दुर्गावती यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि राज्यातील आदिवासी महिलांना सशक्त बनविण्याच्या उद्देशाने ‘विरांगणा राणी दुर्गावती महिला सबळीकरण व सक्षमीकरण मेळाव्याचे’ आयोजन नागपूरमधील कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात आले. रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी झालेल्या या मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी मेळाव्याचे थेट प्रक्षेपण यावलमधील प्रकल्प कार्यालयात करण्यात आले, जिथे हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव व महिलांनी सहभाग घेतला.

या मेळाव्यात दोन ते तीन हजार आदिवासी महिला सहभागी झाल्या होत्या. राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजने’ अंतर्गत महिलांना वैयक्तिक लाभासाठी ५० हजार रुपयांपर्यंत तर सामूहिक उपक्रमांसाठी ७ लाख ५० हजार रुपयांपर्यंत १०० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेत लाभार्थ्यांना यापुढे आर्थिक सहभागाची अट भरण्याची गरज भासणार नाही, ही महत्त्वपूर्ण घोषणा महिलांसाठी मोठा दिलासा ठरली.
कार्यक्रमात आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय योजनांमधून निवड करून विविध लाभांचे वाटप करण्यात आले. याचबरोबर पारंपरिक व बोलीभाषेतील आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले. यामुळे उपस्थित महिलांना त्यांच्या समृद्ध वारशाचा अभिमान वाटल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यावल येथील स्थानिक कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अमोल जावळे, प्रांताधिकारी बबन काकडे, प्रकल्प अधिकारी अरुण पवार, तहसीलदार मोहनमाला नाझिरकर, गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड तसेच मध्यप्रदेशातील क्रांतिकारक तंट्या भील यांचे वंशज आणि विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी व स्थानिक मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे सामाजिक संस्थांच्या मिरवणुका, पारंपरिक पोशाखातील जीवंत देखावे व चित्ररूपी सादरीकरण. पंचक्रोशीतील सात ते आठ हजार आदिवासी बांधव आणि भगिनींनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे उत्तम आयोजन व व्यवस्थापनामुळे संपूर्ण परिसरात उत्सवी आणि गौरवशाली वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नरेंद्र राठोड यांनी केले तर आभार सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रकल्प कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



