Home क्राईम पाल अभयारण्यात अवैध वाळूवर धडक कारवाई; ट्रॅक्टर जप्त, चालक फरार

पाल अभयारण्यात अवैध वाळूवर धडक कारवाई; ट्रॅक्टर जप्त, चालक फरार


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल अभयारण्यातील पाल वनपरिक्षेत्रात अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी वन विभागाने सुरू केलेल्या ‘वॉश आऊट मोहिमे’ला मोठे यश मिळाले आहे. गुरुवारी दुपारी झालेल्या धडक कारवाईत अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला, तर चालक मात्र घटनास्थळावरून पसार झाला. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पर्यावरणप्रेमी आणि पर्यटकांकडून वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी वन विभागाचे पथक पाल वनपरिक्षेत्रातील पाल ते गारखेडा रस्त्यावर गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना (MH19-BG-4611) या क्रमांकाचा एक ट्रॅक्टर अवैधरित्या वाळू वाहतूक करताना आढळून आला. वन कर्मचाऱ्यांना पाहताच ट्रॅक्टरचा चालक आपले वाहन तिथेच सोडून तात्काळ पळून गेला. वन विभागाने तत्परतेने हा ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त करून पाल वनपरिक्षेत्र कार्यालयात जमा केला आहे.

ही कारवाई नाशिकचे उपवनसंरक्षक (वन्यजीव) कृष्णा भवर, सहाय्यक वनसंरक्षक सत्यजित निकत आणि मंगेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांच्या नेतृत्वाखाली वनपाल संभाजी सूर्यवंशी, प्रवीण पाटील, वनरक्षक रणधीर काटे, रोहिदास पाटील, संजय बारेला, जगदीश बारेला, राजमल बारेला, सकीन तडवी आणि धनाबाई भादले या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली.

विशेष म्हणजे, गेल्या १५ दिवसांतील ही तिसरी, तर मागील १५ वर्षांतील ही पाचवी सर्वात मोठी कारवाई आहे. वन विभागाच्या या सातत्यपूर्ण आणि धडक कारवाईमुळे पाल अभयारण्याचे सौंदर्य, जैवविविधता आणि पर्यावरणीय समतोल टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने ही मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. वन विभागाच्या या तत्परतेमुळे वाळू माफियांना चांगलाच हादरा बसला असून, अभयारण्यातील जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी उचललेले हे पाऊल निश्चितच प्रशंसनीय आहे.


Protected Content

Play sound