Home क्राईम ब्रेकींग न्यूज : कोल्हे नगरात मध्यरात्री दोन जणांकडून गोळीबार; परिसरात खळबळ !

ब्रेकींग न्यूज : कोल्हे नगरात मध्यरात्री दोन जणांकडून गोळीबार; परिसरात खळबळ !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कोल्हे नगर परिसरात गुरुवारी ७ ऑगस्ट मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास एका घरात दोन तरुणांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी याबाबत चौकशीला सुरुवात केली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हे नगर परिसरात राजू सपकाळे हे आपल्या कुटुंबासह एका भाड्याच्या घरात राहतात. गुरुवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास त्यांच्या ओळखीचे असलेले दोन तरुण त्यांच्या घरी आले. घराच्या मागील खोलीत गेल्यानंतर यातील एका तरुणाने दारूच्या नशेत गोळीबार केला. गोळीबार करण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मध्यरात्री ही घटना घडल्यामुळे सुरुवातीला कुणालाही याबाबत माहिती नव्हती. मात्र, दुपारच्या सुमारास हा प्रकार समोर आल्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ आणि त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, त्यांना गोळीबारातील एक पुंगळी (Bullet Casing) हस्तगत करण्यात यश आले आहे. या घटनेमुळे कोल्हे नगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेमागील कारण आणि आरोपींचा शोध घेत आहेत. रामानंदनगर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.


Protected Content

Play sound