Home प्रशासन जिल्हा परिषद झेडपीत बोगस भरती : क्रांतीदिनी फटाके फोडो आंदोलन !

झेडपीत बोगस भरती : क्रांतीदिनी फटाके फोडो आंदोलन !


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा परिषद बांधकाम विभाग, जळगावचे कार्यकारी अभियंता सुनील पाटील आणि सहाय्यक कामगार आयुक्त तथा धुळे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षांनी संगनमताने ‘गार्डबोर्ड’च्या नावाखाली केलेल्या बोगस सुरक्षा रक्षक भरतीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. ९ ऑगस्ट, क्रांतीदिनी जिल्हा परिषदसमोर ‘फटाके फोडो’ आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी दिला आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांनी डॉ. सोनवणे यांना पत्र पाठवून, जिल्हा परिषदेअंतर्गत नियुक्त झालेले सुरक्षा रक्षक धुळे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यालयामार्फत नेमल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, सहाय्यक कामगार आयुक्त तथा धुळे सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षांनीही डॉ. सोनवणे यांना पाठवलेल्या पत्रात, कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांच्या मागणीनुसार १७ नावांची शिफारस केली असून त्यांची नियुक्ती गार्ड बोर्डामार्फत झाल्याचे नमूद केले आहे.

या पत्रांमधून हे स्पष्ट होते की, कार्यकारी अभियंता सुनील पाटील आणि सहाय्यक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष धुळे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ यांनी संगनमताने, आपल्या मर्जीनुसार ही नियमबाह्य भरती प्रक्रिया राबवली आहे. सुनील पाटील यांनी शिफारस केलेली ही १७ नावे नियमबाह्य भरतीचे ‘मास्टरमाईंड’ असून, त्यांच्या शिफारशीला मोठ्या मनाने मंजुरी देणारे सहाय्यक कामगार आयुक्त हे देखील यात सामील असल्याचे दिसून येते. ज्यांनी पैसे दिले, त्यांची नावे या यादीत समाविष्ट करून ही बोगस भरती प्रक्रिया राबवली गेली आहे.

या गंभीर प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल या या बोगस भरती प्रक्रियेवर कोणती कारवाई करणार, याकडे आता जळगाव जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले हे आंदोलन या प्रकरणाला आणखी वाचा फोडण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound