
रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर मतदारसंघातील सावदा शहरात राजकीय वाऱ्यांची दिशा पुन्हा एकदा बदलली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात होत असलेल्या विकासकामांनी प्रभावित होऊन विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे सावद्यात शिवसेनेची ताकद लक्षणीय वाढली असून, आगामी राजकीय समीकरणांवर त्याचा ठळक परिणाम होण्याची शक्यता आहे.

या सामूहिक प्रवेश सोहळ्यात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष युनूस तडवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजू तडवी यांच्यासह जाकीर तडवी, आमीन तडवी, राजू तडवी, शाहरुख तडवी, अमर तडवी, मनोज तडवी, जावीद तडवी आणि इरफान तडवी या प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या ध्वजाखाली प्रवेश केला. या सर्व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीवर आणि विकासाच्या दृष्टिकोनावर पूर्ण विश्वास व्यक्त करत, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी दर्शवली.
प्रवेश कार्यक्रमावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख छोटूभाऊ भोई, तालुकाप्रमुख नवनीत पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज राणे, उपतालुकाप्रमुख प्रफुल्ल पाटील, नगरसेवक राजू हिवराळे, युवासेना तालुकाप्रमुख शुभम चौधरी, सावदा शहरप्रमुख मनीष भंगाळे, उपशहरप्रमुख गणेश माळी, राकेश बोराखेडे, शेख नाझीम आणि विकी वाघुळदे यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमात नवप्रवेशित कार्यकर्त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
या घडामोडीनंतर स्थानिक राजकारणात शिवसेनेचा प्रभाव अधिक ठोस झाला असून, तालुका आणि शहर पातळीवर संघटन बळकट करण्यासाठी नवा उत्साह मिळाला आहे. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, अशा सामूहिक प्रवेशामुळे शिवसेनेच्या कार्यक्षेत्रात मोठी वाढ होईल आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्षाचा विजय अधिक सुलभ होईल.



