Home प्रशासन जिल्हा परिषद नगरपंचायतीचा भोंगळ कारभार ; वॉशिंग सेंटरला २४ तास मोफत पाणी 

नगरपंचायतीचा भोंगळ कारभार ; वॉशिंग सेंटरला २४ तास मोफत पाणी 


मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरातील नगरपंचायत प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा जनतेच्या रोषाला सामोरा जात आहे. शहरातील बऱ्हाणपूर रोड परिसरातील दोन वॉशिंग सेंटरना शहराच्या मुख्य जलवाहिनीवरून थेट नळ जोडणी देण्यात आली असून, त्याद्वारे २४ तास मोफत पाणीपुरवठा केला जात आहे. या संदर्भात नागरिकांकडून वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या असतानाही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नगरपंचायत प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

एप्रिल महिन्यात नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी संबंधित पाणीपुरवठा निरीक्षकांना अवैध कनेक्शन तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, चार महिने उलटले तरी प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे प्रशासनातील हलगर्जीपणा, असंवेदनशीलता आणि संभाव्य भ्रष्टाचार यावर नागरिकांकडून संशय व्यक्त केला जात आहे. ही दुर्लक्ष वृत्ती हीच प्रशासनाच्या अपयशाची मूळ कारणे ठरत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

विशेष म्हणजे, शहरातील इतर वॉशिंग सेंटर चालक खासगी ट्यूबवेलचा वापर करत असताना, मुस्लिम कब्रस्तानाजवळील दोन सेंटर मात्र थेट मुख्य जलवाहिनीवरून पाणी घेत असल्याचे उघड झाले आहे. माहिती अधिकारात मिळालेल्या उत्तरानुसार या नळ जोडण्यांना कोणतीही अधिकृत परवानगी नाही आणि त्यातून नगरपंचायतीकडे एक रुपयाही महसूल जमा होत नाही. ही बाब म्हणजे नगरपंचायतीच्या आर्थिक नुकसानीसह कायदाचंही सर्रास उल्लंघन आहे.

या वॉशिंग सेंटरमधून दररोज हजारो रुपयांची आर्थिक उलाढाल होत असताना नगरपंचायतीचा महसूल बुडत आहे. याउलट सर्वसामान्य नागरिकांना पाणी कमी दाबाने येत असून, अनेकांना पंप लावूनही पाण्याची गरज भागवता येत नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, नगरपंचायतीवर अविश्वासाची भावना बळावली आहे.

या प्रकारामुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांनी एकमुखाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, बुडवलेला महसूल वसूल करून, मुख्य जलवाहिनीवरील बेकायदेशीर नळ कनेक्शन त्वरित बंद करण्यात यावेत, अशी मागणी केली जात आहे. भविष्यात अशी पाण्याची चोरी टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे नागरिक स्पष्टपणे सांगत आहेत.


Protected Content

Play sound