रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यामुळे रावेर शहरातून तामसवाडीला जाणारा मुख्य रस्ता पूर्णतः उखडला असून, त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. खड्ड्यांनी भरलेल्या या रस्त्यामुळे नागरिक, वाहनधारक तसेच विद्यार्थी यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी शिवसेना व युवासेनेतर्फे करण्यात आली आहे. अन्यथा शिवसेना-युवा सेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी मुख्याधिकारी, रावेर नगरपालिकेला देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, रावेर-तामसवाडी रस्ता गेल्या काही दिवसांत झालेल्या सततच्या पावसामुळे अक्षरशः खड्ड्यांचा रस्ता बनला आहे. रस्त्यावर इतके मोठे खड्डे पडले आहेत की, दुचाकीस्वारांना दररोज अपघाताचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिक यांना रस्त्यावरून ये-जा करणे अत्यंत धोकादायक बनले आहे.

रस्त्याची ही स्थिती लक्षात घेता, नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाने लक्ष न दिल्यास शिवसेना व युवा सेना स्टाईलने रास्ता रोको, नगरपालिका घेराव, मोर्चा यासारखी तीव्र आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल, असा इशारा दिला गेला. निवेदन देताना शिवसेना तालुकाप्रमुख नितीन भाऊ महाजन, शहरप्रमुख राकेश घोरपडे, युवा सेना शहरप्रमुख निलेश महाजन, वैभव देशमुख, नितीन महाजन, अमोल सोनार, विशाल बेलदार, प्रथमेश महाजन, शहीद सुपडू तडवी, चंदन भालेराव, मनीष महाजन यांच्यासह शालेय विद्यार्थी व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात सांगण्यात आले की, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या नियमित शालेय उपस्थितीसाठी या रस्त्याची तात्काळ डागडुजी किंवा पुनर्बांधणी होणे अत्यावश्यक आहे. केवळ आश्वासनावर न थांबता प्रत्यक्ष काम सुरू झाले पाहिजे, अन्यथा जनआक्रोशाला सामोरे जावे लागेल, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेने घेतली आहे.



