Home Cities जळगाव मराठी विज्ञान परिषद जळगाव विभागाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न!

मराठी विज्ञान परिषद जळगाव विभागाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न!

0
100


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मराठी विज्ञान परिषद, जळगाव विभागाची वार्षिक सर्वसाधारण सभा भवरलाल जैन सभागृह, जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक, दाणा बाजार येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी मराठी विज्ञान परिषद जळगाव विभागाचे अध्यक्ष भालचंद्र पाटील उपस्थित होते. त्यांच्यासोबत विचारमंचावर परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. रवींद्रसिंह पाटील, कार्यवाह प्रा. दिलीप भारंबे आणि कोषाध्यक्ष शशिकांत नेहेते यांची प्रमुख उपस्थिती होती.

सभेच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ दिवंगत श्री. जयंत नारळीकर सर, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले भारतीय नागरिक आणि अहमदाबाद येथील विमान अपघातात प्राण गमावणारे प्रवासी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर परिषदेचे सचिव प्रा. दिलीप भारंबे यांनी मागील सभेचे इतिवृत्त सादर केले, तर कोषाध्यक्ष श्री. शशिकांत नेहेते यांनी वर्षाचा आर्थिक ताळेबंद मांडला.

प्रा. भारंबे यांनी या प्रसंगी माहिती दिली की, जळगाव विभागाने संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक वैज्ञानिक उपक्रम राबवणारा विभाग म्हणून नावलौकिक मिळवला आहे. यात दर शनिवारी आयोजित केला जाणारा विज्ञानवारी प्रकल्प, हसत-खेळत गणित शिकवणे, आणि विज्ञानातील संकल्पना स्पष्ट करण्यासाठी शहर व परिसरातील शाळा-कॉलेजेसमध्ये प्रयोगांचे सादरीकरण यांसारख्या विविध उपक्रमांचा वर्षभर समावेश असतो.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री. भालचंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक आवड आणि गोडी निर्माण व्हावी, या हेतूने मराठी विज्ञान परिषद जळगाव विभाग नेहमीच अग्रेसर राहिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी परिषदेच्या आगामी उपक्रमांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच, सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ दिवंगत प्रा. डॉ. जयंत नारळीकर यांनी सुमारे दहा-बारा वर्षांपूर्वी जळगाव येथे मराठी विज्ञान परिषदेच्या उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा देत उत्कृष्ट मार्गदर्शन केले होते, याची आठवणही श्री. पाटील यांनी करून दिली.

या सभेचे सूत्रसंचालन पक्षी अभ्यासक उमेश इंगळे सर यांनी केले, तर प्रा. रवींद्रसिंह पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी प्रा. आर. बी. देशमुख, प्रा. डॉ. आर. जी. बावने, मोहिनीराज नेतकर, सोमनाथ महाजन, किशोर महाजन, लक्ष्मण तायडे, जयश्री झांबरे, वसंत सोनवणे आदी संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound