जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मराठी बालनाट्य दिनाचे औचित्य साधून, के.सी.ई. सोसायटीच्या शालेय विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी ‘कान्ह कला कट्टा’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा आज शुभारंभ करण्यात आला. नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या उपजत कलाकौशल्यांना विकसित करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. उपस्थित विद्यार्थ्यांच्या हस्तेच या उपक्रमाचे उद्घाटन झाले.
‘कान्ह कला कट्ट्या’चे स्वरूप
के.सी.ई. सोसायटीच्या कान्ह ललित कला केंद्राद्वारे सुरू करण्यात आलेल्या या ‘कान्ह कला कट्टा’ उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांना गायन, वादन, अभिनय, नाट्यतंत्र, लोकनृत्य, चित्रकला आणि शिल्पकला या कलांचे नवीन शैक्षणिक धोरणाच्या आधारे कौशल्यवृद्धी (Skill Development) करण्यात येणार आहे. भविष्यातील शैक्षणिक आव्हानांना सर्जनशीलतेने कसे सामोरे जावे, याचे कलेच्या माध्यमातून शास्त्रशुद्ध शिक्षण या उपक्रमात दिले जाईल. के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे आणि व्यवस्थापन मंडळ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकार झाला आहे.

विविध शाळांतील विद्यार्थ्यांसाठी संधी
बालनाट्य दिनाचे औचित्य साधून के.सी.ई. सोसायटी संचालित गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालय, ए. टी. झांबरे विद्यालय, ओरियन स्टेट बोर्ड तसेच सी.बी.एस.ई. आणि किलबिल बालक मंदिर या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ‘कान्ह कला कट्ट्या’चे उद्घाटन करण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते फीत कापून या कला कट्ट्याचे प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन झाले.
यावेळी के.सी.ई. सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, कान्ह ललित कला केंद्राचे समन्वयक प्रसाद देसाई, ए. टी. झांबरे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, ओजस्विनी कला महाविद्यालयाचे प्राचार्य मिलन भामरे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.
अनुभवी तज्ञांचे मार्गदर्शन
या कट्ट्यामध्ये विद्यार्थ्यांना नृत्य, नाट्य, अभिनय, चित्रकला, शिल्पकला, वादन, गायन इत्यादी कलांचे मार्गदर्शन विशेष प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिले जाईल. यासाठी नृत्य शिकवण्यासाठी अजय शिंदे, गायनासाठी मयुरी हरिमकर, तालवादनासाठी देवेंद्र गुरव, बासरीसाठी प्रसाद कासार, अभिनय व नाट्यतंत्रासाठी वैभव मावळे, हेमंत पाटील, दिनेश माळी तर चित्रकलेसाठी पुरुषोत्तम घाटोळ, पियुष बडगुजर आणि शिल्पकलेसाठी दिगंबर शिरसाळे या अनुभवी तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या कला सहजतेने वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उपशिक्षक योगेश भालेराव, चंद्रकांत कोळी आदी शिक्षक उपस्थित होते.



