Home प्रशासन नगरपालिका कानबाई उत्सवापूर्वी पारोळ्यातील रस्त्यांची डागडुजी, स्वच्छतेवर भर !

कानबाई उत्सवापूर्वी पारोळ्यातील रस्त्यांची डागडुजी, स्वच्छतेवर भर !


पारोळा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खान्देशाची ग्रामदैवत आई कानबाई माता उत्सवाला उद्या, रविवारपासून (३ ऑगस्ट) सुरुवात होत आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पारोळा नगरपालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. भाविकांना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासह शहरभर साफसफाई आणि स्वच्छतेची मोहीम राबवण्यात येत आहे.

उत्सवासाठी शहरात जय्यत तयारी
उद्या, रविवारी शहरात घरोघरी कानबाई मातेची भक्तिभावाने स्थापना केली जाईल. त्यानंतर सोमवारी (४ ऑगस्ट) देवीची विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत महिला, युवती, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि बालके मोठ्या उत्साहात नाचून, फुगड्या खेळून सहभागी होतात आणि जल्लोष साजरा करतात. याच पार्श्वभूमीवर, देवीच्या विसर्जन मुख्य मार्गावर म्हणजेच श्रीराम मंदिर चौक, कासार गणपती चौक, रथ चौक, गावहोळी चौक, नगरपालिका चौक, तलाव गल्ली या ठिकाणी पावसाने पडलेले मोठे खड्डे नगरपालिकेने काळजीपूर्वक बुजवले आहेत. तसेच, देवी विसर्जन स्थळी, वडाजवळ आणि विहिरीसह संपूर्ण परिसरात साफसफाई आणि स्वच्छता करण्यात आली आहे.

मुख्याधिकाऱ्यांच्या सूचनांमुळे भाविकांत समाधान
भाविकांना आनंदोत्सव साजरा करताना कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये याची खबरदारी घेत, नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक किशोर चव्हाण यांनी आज कर्मचाऱ्यांना तात्काळ सूचना दिल्या. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेमुळे भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त होत आहे. प्रशासनाने केलेल्या या तयारीमुळे कानबाई माता उत्सव निर्विघ्नपणे आणि उत्साहात साजरा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound