यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । माहेरून मोटारसायकल घेण्यासाठी १ लाख रुपयांची मागणी करत विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनमध्ये पती व सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना धुळे जिल्ह्यातील बोरव्हिर येथील सासरी वेळोवेळी घडली आहे. याबाबत रवींद्र काजल ढमढेरे (वय २८, व्यवसाय गृहिणी, रा. बोरव्हिर, ता. जि. धुळे, ह.मु. साकळी, ता. यावल, जि. जळगाव) यांनी याबाबत यावल पोलीसात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काजल ढमढेरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा पती रवींद्र नामदेव ढमढेरे (वय ३८) आणि सासू उषाबाई नामदेव ढमढेरे (वय ५४, दोघे रा. बोरव्हिर, ता. जि. धुळे) यांनी तिला सतत त्रास दिला. आरोपींनी काजलकडे तिच्या आई-वडिलांकडून मोटारसायकल घेण्यासाठी १ लाख रुपये आणण्याचा तगादा लावला होता. या मागणीसाठी पती रवींद्रने तिला शिवीगाळ केली, तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सासू उषाबाईनेही संगनमताने काजलला वेळोवेळी पैशांची मागणी करून मानसिक व शारीरिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून काजलने अखेर यावल पोलीस ठाण्यात धाव घेतली.

तिच्या तक्रारीवरून यावल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ रोहिल गणेश हे करत आहेत.



