जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जैन हिल्स परिसरात बुद्धिबळप्रेमींसाठी सुवर्णसंधी ठरू घातलेल्या ३८व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते होणार आहे. २ ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान आयोजित या भव्य स्पर्धेमुळे जळगावमध्ये प्रथमच राष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळासाठी मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही स्पर्धा जैन इरिगेशन सिस्टीम्स लि., जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली असून, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. उद्घाटन प्रसंगी अशोक जैन (अध्यक्ष, जैन इरिगेशन), अतुल जैन, ग्रॅण्डमास्टर अभिजीत कुंटे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले, तसेच जळगाव बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव नंदलाल गाडिया उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेत देशभरातील सुमारे ५५० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. त्यात ४०० फिडे मानांकन प्राप्त खेळाडू असून, पुण्याचा अद्विक अग्रवाल (२२५१) व केरळची देवी बीजेस (१८६९) हे प्रमुख आव्हान ठरणार आहेत. विशेष म्हणजे, या स्पर्धेच्या केंद्रबिंदू ठरणार आहे केवळ ५ वर्षांचा वल्लभ कुलकर्णी (छत्रपती संभाजीनगर), ज्याने आपल्या वयाच्या मानाने बुद्धिबळातील प्रावीण्य दाखवत स्पर्धेतील लक्ष वेधले आहे. त्याचप्रमाणे भारतीय वंशाचे काही विदेशी खेळाडूही या स्पर्धेत सहभागी होत असून, ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय रंग घेणार आहे.
या स्पर्धेतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ११ फेऱ्यांमध्ये २७५ बुद्धिबळ पटांवर सामने खेळवले जाणार असून, त्यातील पहिले सहा सामने डिजिटल बोर्डवर थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षक आणि प्रशिक्षक यांना सामन्यांचे थेट विश्लेषण करता येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ८ लाख रुपयांची रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. प्रत्येक खेळाडूच्या खेळाच्या मूल्यमापनानुसार पारितोषिकांचे वितरण होणार असून, जैन इरिगेशनने अशा स्वरूपाची रोख पारितोषिक पद्धत जळगावमध्ये सुरू करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
जळगावसारख्या शहरात अशा भव्य स्पर्धेचे आयोजन होणे ही संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरत असून, बुद्धिबळाच्या माध्यमातून जळगावचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न यामध्ये दिसून येत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून नवोदित खेळाडूंना मोठ्या संधी मिळणार आहेत तसेच प्रेक्षकांसाठी देखील ही स्पर्धा एक मोठा बुद्धिबळ महोत्सव ठरणार आहे.



