खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पंढरपूरची आषाढीवारी पूर्ण करून परतणाऱ्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे ३० जुलै रोजी रजत नगरी खामगावात आगमन झाले. १३०० किलोमीटरचा खडतर प्रवास, ऊन, वारा आणि पावसाचा सामना करत, अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने ही पालखी परतली आहे. पावसातही न ढळलेली पालखीची दिव्य शान आणि तिच्यासोबतचा वारकऱ्यांचा उत्साह लक्षवेधी ठरला.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेली श्री संत गजानन महाराजांची पालखी परतीच्या प्रवासात आपल्या अंतिम टप्प्यात खामगावात पोहोचली आहे. या पालखीमध्ये ७०० पेक्षा जास्त पताकाधारी वारकरी सहभागी असतात, जे प्रचंड कष्ट आणि भक्तीभावाने पायी चालतात. या १३०० किलोमीटरच्या प्रवासात संस्थेने उभारलेली स्वतंत्र यंत्रणा आणि तिचे नियोजनबद्ध कार्य अत्यंत प्रभावीपणे जाणवते. उद्या, खामगाव ते शेगाव या १७ किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्यासाठी सुमारे एक लाखापेक्षा जास्त पायदळ भाविक भक्त या पताकाधारी वारकऱ्यांसोबत पालखीला शेगाव मंदिरापर्यंत पोहोचवण्यासाठी पायी प्रवास करणार आहेत.

श्री संत गजानन महाराज संस्थानने राबवलेली नियोजनबद्ध पद्धत, शिस्त, स्वच्छता आणि नम्रता यामुळे या पालखीने संपूर्ण देशात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. उद्या, खामगाव ते शेगाव या १७ किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्यासाठी सुमारे एक लाखापेक्षा जास्त पायदळ भाविक भक्त या पताकाधारी वारकऱ्यांसोबत पालखीला शेगाव मंदिरापर्यंत पोहोचवण्यासाठी पायी प्रवास करणार आहेत, हे विशेष. श्रींच्या पालखीचा हा दिव्य प्रवास आणि तिची स्वयंशिस्त भक्ती आणि श्रद्धेचे एक उत्तम उदाहरण आहे.



