Home क्राईम रावेरमध्ये झन्ना मन्ना पत्त्याच्या क्लबवर धाडसी कारवाई; सहा जणांविरुद्ध गुन्हा

रावेरमध्ये झन्ना मन्ना पत्त्याच्या क्लबवर धाडसी कारवाई; सहा जणांविरुद्ध गुन्हा


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरात रसलपूर रस्त्यावरील एसटू हॉटेलच्या मागील बाजूस बाबुळच्या झाडाखाली सुरू असलेल्या अवैध पत्त्याच्या क्लबवर पोलिसांनी कारवाई करत सुमारे ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, शहरातील अवैध व्यवहारांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांना ‘झन्ना मन्ना’ नावाचा मांग पत्त्याचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ सदर ठिकाणी छापा टाकला. कारवाईदरम्यान ११ हजार रुपयांची रोख रक्कम, अंदाजे ७५ हजार रुपयांच्या दोन मोटारसायकली आणि पत्त्यांचा कॅट जप्त करण्यात आला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक जुगार खेळत असल्याचे आढळून आले.

या प्रकरणात अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोकॉ गणेश भदाणे यांनी रावेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार विनायक सुनिल महाजन, सुरज महाजन, रितेक महाजन, लव महाजन, शुभम महाजन आणि मनिष महाजन यांच्याविरोधात गु.र.नं. ३२७/२०२५ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम (१२अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपूर्ण कारवाई पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, सहायक पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप आणि रावेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पुढील तपास पोकॉ योगेश पाटील करत आहेत.

शहरातील मध्यवर्ती भागात सर्रास सुरू असलेल्या अशा अवैध क्लबांवर पोलिसांची ही कारवाई इशारा देणारी ठरत आहे. या प्रकरणामुळे अवैध जुगार अड्ड्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस अधिक सक्रीय होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound