
भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे बालरोगतज्ञ आणि बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. अनंत बेंडाळे आणि कान-नाक-घसा तज्ञ डॉ. पंकजा बेंडाळे यांचे सुपुत्र चि. रिद्धेश बेंडाळे याने पॅरिस येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिंपियाड (IPhO) २०२५ मध्ये सुवर्णपदक जिंकून भारताचा गौरव केला आहे. त्याच्या या दैदीप्यमान कामगिरीमुळे गोदावरी परिवारात आणि संपूर्ण भुसावळ शहरात जल्लोषाचे वातावरण आहे.

१८ ते २४ जुलै २०२५ या कालावधीत पॅरिसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत ८७ देशांतील ४१५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत तीन सुवर्ण आणि दोन रौप्य पदके पटकावली आहेत. भारतासाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्यांमध्ये रिद्धेश अनंत बेंडाळे (भुसावळ, महाराष्ट्र) याच्यासोबत कनिष्क जैन (पुणे, महाराष्ट्र) आणि स्नेहिल झा (जबलपूर, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे. तर आगम जिग्नेश शाह (सुरत, गुजरात) आणि रजित गुप्ता (कोटा, राजस्थान) यांनी रौप्यपदके जिंकली.
या स्पर्धेत पदक तालिकेत भारताने जपान, तैवान आणि रशियासह ५ वे स्थान प्राप्त केले आहे, ही देशासाठी अभिमानास्पद बाब आहे. रिद्धेशच्या या यशानंतर गोदावरी परिवारात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भुसावळमध्ये त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्याच्या कामगिरीमुळे शहरातील युवा पिढीलाही विज्ञानाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. रिद्धेशने केवळ आपले कुटुंबच नव्हे, तर भुसावळ शहर आणि महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्वल केले आहे.



