Home Cities मुक्ताईनगर संत मुक्ताई पालखी परतवारी नियोजनासाठी आ. चंद्रकांत पाटील यांची आढावा बैठक

संत मुक्ताई पालखी परतवारी नियोजनासाठी आ. चंद्रकांत पाटील यांची आढावा बैठक


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथे गेल्या ६ जूनपासून आषाढी वारीसाठी गेलेल्या संत मुक्ताई पालखीच्या परतवारीच्या नियोजनासंदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी, २९ जुलै रोजी दुपारी १ वाजता तहसील कार्यालयातील आपल्या दालनात अधिकाऱ्यांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीला तहसील कार्यालय, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग आणि महावितरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत आमदार पाटील यांनी पालखी सोहळ्याच्या नियोजनासंदर्भात अनेक सूचना दिल्या. संत मुक्ताई नवीन मंदिर, मुक्ताईनगर ते कोथळी येथील मूळ मंदिर असा सुमारे तीन किलोमीटरचा पायी प्रवास पालखी सोहळ्याचा असेल. या सोहळ्यात शेकडो दिंड्या आणि हजारो वारकरी पालखीच्या स्वागतासाठी शहरात येतील. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. या गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, मुक्ताईनगर नगरपंचायत, तसेच महावितरण विभागाला आमदार चंद्रकांत पाटील यांनी विशेष सूचना दिल्या.

शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी अवजड वाहतूक शहराबाहेरून वळवण्याची आणि आवश्यक बंदोबस्त लावण्याची सूचना पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांना आमदारांनी केली. आरोग्य विभागाला संत मुक्ताई नवीन मंदिर आणि जुने मंदिर या दोन्ही ठिकाणी आरोग्य पथके तैनात ठेवण्यास सांगितले, तसेच पालखीसोबतही फिरते आरोग्य पथक तैनात असणार आहे. नगरपंचायतीला शहरात स्वच्छता ठेवण्याचे आणि इतर अडचणी सोडवण्याचे आदेश आमदारांनी दिले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही विजेच्या संदर्भात योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांनी यावेळी माहिती दिली की, पालखीसाठी मुक्ताईनगर शहरात ५५ कर्मचारी, पाच अधिकारी, चोरी प्रतिबंधात्मक पथक आणि वाहतूक नियंत्रण पथक असा चोख बंदोबस्त राहणार आहे.

या बैठकीला तहसीलदार गिरीश वखारे, नायब तहसीलदार निकेतन वाळे, पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश राणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अमितकुमार घडेकर, नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी सुभाष जानोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख छोटू भोई, शिवसेना जिल्हा संघटक सुनील पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, विधानसभा संघटक महेंद्र मोंढाळे, तसेच सामाजिक कार्यकर्ते, महावितरणचे अधिकारी आणि इतर विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. पालखी सोहळा शांततेत आणि उत्साहात पार पडावा यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.


Protected Content

Play sound