जळगाव प्रतिनिधी । फुले मार्केटमध्ये सोमवारी झालेल्या वादातून पाच-सहा जणांनी एकाला बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी शहर पोलीसात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. मारहाण केल्याची गंभीर दखल घेत आज जिल्हा पोलीस अधिक्ष पंजाबराव उगले आणि विभागीय पोलीस अधिकारी निलाभ रोहन यांनी फुले मार्केटमधील घटनास्थळी भेट देवून चौकशी केली.
याबाबत माहिती अशी की, शहरातील फुले मार्केटमधील हॉकर्सच्या दोन गटांमध्ये सोमवारी वाद झाला होता. यावादात अकील शेख माजिद कुरेशी (वय २६ रा. कय्युम देशमुखनगर) याला समाधानसह पाच ते सहा जणांनी बेदम मारहाण केली. जखमी अकील यांच्याफिर्यादीवरून शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
फुले मार्केटमधील चंदुलाल रसवंतीजवळ समाधान (पूर्ण नाव माहिती नाही) याचा अकील शेख माजिद कुरेशी याच्याशी वाद झाला. या वादातून समाधान याने त्याला नाव विचारुन ‘जय श्रीराम’ म्हण असे सांगितले. त्याने तसे न म्हटल्याने समाधान, नितीन पाटील, सचिन भाचा, जया जोशी, लाला बिल्डर या पाच जणांनी त्याला बेदम मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीसांनी याप्रकरणी सुनिल दुर्योधन सैदाणे (वय24) रा. आसोदा रोड आणि कैलास मनोहरसिंग राजपूत (वय -24) रा. शिवाजी नगर यांना शहर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, उपविभागीय पोलीस अधिकारी निलाभ रोहन यांनी फुले मार्केट येथील घटनास्थळी भेट देवून दोन विक्रेत्यांची चौकशी केली.