जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात लम्पी स्कीन डिसीजचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे मोफत उपचार आणि लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पथके बाधित क्षेत्रांमध्ये उपचार करत असून, पशुपालकांमध्ये जनजागृतीही केली जात आहे.
पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांना आवाहन केले आहे की, जनावरांमध्ये लम्पीचे गाठे येणे, ताप येणे, दूध उत्पादनात घट होणे, अशक्तपणा आदी लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. लम्पी लसीकरण हा रोगप्रतिकारक उपाय असून, जिल्ह्यात वासरांपासून ते मोठ्या जनावरांपर्यंत लसीकरण सुरू आहे. भटक्या जनावरांचेही लसीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा आजाराचा प्रसार वाढण्याचा धोका अधिक आहे.

पशुसंवर्धन विभागाचे पथक गावोगावी जाऊन तपासणी, उपचार व मार्गदर्शन करत आहे. या मोहिमेत पशुपालकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. आपल्या जनावरांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे, असे आवाहनही विभागाने केले आहे. अधिक माहितीसाठी व उपचारासाठी जिल्हा तसेच तालुका पशुवैद्यकीय केंद्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



