अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यात गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी गुरूवारी २४ जुलै रोजी पहाटे ४ वाजता मोठ्या शिताफीने पाठलाग करून अटक केली आहे. त्यांच्याकडून सव्वा लाखांचा ८ किलो गांजा, मोटरसायकल आणि दोन मोबाईल असा एकूण २ लाख ६२ हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना २० जुलै रोजी रात्री गोपनीय माहिती मिळाली की, चोपडा तालुक्यातील गलंगी गावाकडून दोन जण दुचाकीीवरून गांजा विक्रीसाठी चोपडा शहराकडे आणत आहेत. माहिती मिळताच, त्यांनी तात्काळ हेडकॉन्स्टेबल विष्णू बिऱ्हाडे, रवींद्र पाटील आणि दीपक माळी यांना पाळतीवर ठेवले.

पोलिसांचा सुगावा लागताच संशयित आरोपींनी दुचाकी क्रमांक ( (एमएच १८ बी डब्ल्यू ८०३५) शहराकडे पळ काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी या तिन्ही पोलिसांनी त्यांचा ‘सिनेस्टाईल’ पाठलाग सुरू केला. त्याचबरोबर, त्यांनी पुढे शहरात पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वलटे आणि विलेश सोनवणे यांना कळवून नाकाबंदी करण्यास सांगितले. पोलिसांची नाकाबंदी पाहताच आरोपींनी दुचाकीवरून उडी मारून पळ काढला. मात्र, पोलीस उपनिरीक्षक वलटे यांनी धावत त्यांचा पाठलाग करत पकडले.
चौकशी केली असता त्यांनी आपली नावे उदयभान संजय पाटील (वय २१, रा. चांग्या निम जवळ, अडावद, ता. चोपडा) आणि योगेश रामचंद्र महाजन (वय २१, रा. खालचा माळी वाडा, अडावद, ता. चोपडा) अशी सांगितली. त्यांच्याकडून ८ किलो १३० ग्रॅम गांजा, दोन मोबाईल आणि दुचाकी असा एकूण २ लाख ६२ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर हे करीत आहे.



