अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर पोलीस ठाण्यात २३ जुलै रोजी दाखल करण्यात आलेल्या एका अकस्मात मृत्यूच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. तपासानंतर हा अपघात नसून वैजंताबेन भगवान भोई (वय ५०, रा. कुबेरनगर, सुरत, गुजरात) यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी अनिल गोविंदा संदानशिव (रा. सुमठाणे, ता. पारोळा) याला अटक करण्यात आली आहे. अमळनेर पोलीस ठाण्यात २५ जुलै रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर अकस्मात मृत्यूची घटना जानवे वनक्षेत्रातील होती. घटनास्थळ पारोळा पोलीस ठाण्याच्या हद्दीपासून १ किमीपेक्षा कमी अंतरावर असल्याने सुरुवातीला संशयित आरोपीची या अकस्मात मृत्यूच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांनी केलेल्या तपासात, मयत वैजंताबेन भोई यांचा आधारकार्ड क्रमांक आणि मोबाईल क्रमांक तपासण्यात आला. तांत्रिक, मौखिक पुरावे आणि घटनास्थळावरील उपलब्ध पुराव्यांवरून अनिल गोविंदा संदानशिव यानेच वैजंताबेन भोई यांचा खून केल्याचे स्पष्ट झाले.

तपासात मयत वैजंताबेन भोई यांचा मोबाईल आणि संशयित आरोपी अनिल संदानशिवचा मोबाईल हे दिनांक २ ते ५ मे दरम्यान वेळोवेळी संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. यावरून आरोपीने मयत महिलेला काहीतरी आमिष दाखवून जानवे (ता. अमळनेर) वनक्षेत्रात नेले आणि तिथे तिची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांनी दिलेल्या सूचना व तांत्रिक विश्लेषणानुसार ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस निरीक्षक संदीप पाटील (स्थानिक गुन्हे शाखा), पोलीस उपनिरीक्षक शरद बागल (स्थानिक गुन्हे शाखा), पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, पोहेकॉ कैलास शिंदे, पोहेकॉ काशिनाथ पाटील आणि पोकों सागर साळुंखे यांच्या पथकाने एकत्रितपणे मानवी अवशेषांवरून हा गुन्हा अनिल गोविंदा संदानशिव यानेच केल्याचे सिद्ध केले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम करत आहेत.



