जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतकऱ्यांच्या शेतीसंबंधित माहितीचे डिजिटायझेशन करून त्यांना अचूक, पारदर्शक आणि जलद सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘ॲग्रीस्टॅक’ योजनेबाबत जळगाव जिल्हास्तरावर एका विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या योजनेमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
या मार्गदर्शन सत्राचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भूषवले. त्यांनी जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी आणि डेटा बेस ॲडमिनिस्ट्रेटर (DBA) यांना योजनेच्या महत्त्वावर सखोल मार्गदर्शन केले. हे सत्र दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आले होते, ज्यामुळे जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी यात सहभागी होऊ शकले.

जिल्हाधिकारी प्रसाद यांनी ‘ॲग्रीस्टॅक’ योजनेमुळे शेतकऱ्यांना आधारभूत सेवा अधिक सुलभ होतील, असे स्पष्ट केले. तसेच, महसूल विभागाने या योजनेचा सखोल अभ्यास करून गावागावात शेतकऱ्यांमध्ये याविषयी जागृती निर्माण करण्याचे आवाहन केले.
यावेळी शेतकऱ्यांसाठी तयार केलेला एक माहितीपट (व्हिडीओ) दाखवण्यात आला. या माहितीपटात योजनेची माहिती सोप्या व सुलभ भाषेत समजावून सांगितली होती. या माहितीपटाचा उपयोग ग्रामस्तरावर शेतकऱ्यांना योजना समजावून सांगण्यासाठी करावा, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. ‘ॲग्रीस्टॅक’ योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतजमिनीची माहिती, पीक नमुना, सिंचन, आर्थिक व्यवहार यांसारखी माहिती एकत्रित आणि डिजिटल स्वरूपात ठेवून शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिक जलद, पारदर्शक आणि अचूक पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हे आहे. यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होण्याची शक्यता आहे.



