Home क्राईम धावत्या रेल्वेत माजी सैनिकाचा प्रताप: दारूच्या नशेत टीसीला मारहाण

धावत्या रेल्वेत माजी सैनिकाचा प्रताप: दारूच्या नशेत टीसीला मारहाण


जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | 24 जुलै रोजी कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये ड्युटीवर असलेल्या टीसीला श्याम रमेश गायकवाड (वय 41, रा. कुर्देवाडी, ता. निफाड, जि. नाशिक) यांना एका प्रवाशाने मारहाण केल्याची घटना घडली. दारू पिऊन प्रवाशांना त्रास देणाऱ्या या इसमावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्याम गायकवाड हे मनमाड येथून इटारसीकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसमधील एस/3, एस/4 आणि एस/5 या कोचमध्ये तिकीट तपासणी करत होते. गाडी सुरू झाल्यानंतर एस/4 कोचमधील काही प्रवाशांनी गायकवाड यांच्याकडे धाव घेतली. प्रबिर माहिती (वय 56), रत्नेश सोनवणे (वय 21), किरण राठोड (वय 20) आणि दिलीप शर्मा (वय 32) या प्रवाशांनी सांगितले की, त्यांच्या सीटवर एक दारुड्या प्रवासी जबरदस्तीने बसला असून तो त्यांना मानसिक त्रास देत आहे, शिवीगाळ करत आहे. त्याच्यामुळे महिला आणि लहान मुलांनाही भीती वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रवाशांची समस्या ऐकून गायकवाड तातडीने एस/4 कोचमध्ये गेले. त्यांनी दारू पिलेल्या अंदाजे 39 वर्षीय प्रवाशाला तिकीट आणि प्रवासाबाबत विचारपूस केली. मात्र, कोणताही कारण नसताना त्या प्रवाशाने गायकवाड यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे, तर मारहाण करण्याच्या उद्देशाने त्याने गायकवाड यांची कॉलर पकडून त्यांच्या गळ्यावर चापट मारली. या झटापटीत गायकवाड यांच्या सफेद रंगाच्या हाफशर्टची तीन बटणे तुटली आणि शर्ट बटनाजवळ फाटला.

घटनेची माहिती मिळताच हेड टीसी सुनील मोरे, वाल्मीक भावड आणि के.एस. पवार घटनास्थळी हजर झाले. आरोपीने त्यांच्यासमोरही अश्लील शिवीगाळ करत “तुला मी सोडणार नाही, गाडीतून खाली फेकून देईन” अशी धमकी दिली. गायकवाड यांनी लगेचच कमर्शियल कंट्रोलला संपर्क साधून जळगाव रेल्वे स्टेशनवर आरपीएफ आणि जीआरपीला बोलावण्याची विनंती केली.
नगरदेवळा स्टेशनजवळ ही घटना घडली. त्यानंतर सुमारे एका तासाने गाडी जळगाव स्टेशनवर पोहोचली. तेथे हजर असलेल्या जीआरपी आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. आरपीएफ एएसआय परदेशी यांनी चौकशी केली असता, आरोपीने त्याचे नाव हिरामन तुळशिराम निकम (वय 39, रा. हिंगळवाडी, ता. पाले बु., जि. नाशिक) असे सांगितले. तो सेवानिवृत्त माजी सैनिक असून त्याच्याकडे पुष्पक एक्स्प्रेसचे तिकीट सापडले, परंतु कर्नाटक एक्स्प्रेसचे कोणतेही वैध तिकीट नव्हते.

सरकारी कामात अडथळा निर्माण करून मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी श्याम गायकवाड यांनी लेखी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून हिरामन निकमविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound