Home क्राईम मोठी बातमी : चार गावठी कट्टे आणि ८ जिवंत काडतुसांसह दोन आरोपी...

मोठी बातमी : चार गावठी कट्टे आणि ८ जिवंत काडतुसांसह दोन आरोपी जेरबंद


चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा ग्रामीण पोलिसांनी दमदार कामगिरी करत पुणे आणि धाराशिव जिल्ह्यातील दोन आरोपींना ४ गावठी कट्टे (अग्नीशस्त्र) आणि ८ जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. मध्य प्रदेशातील पारउमटी येथील शिकलकर समाजाकडून अवैध अग्नीशस्त्र आणि दारूगोळा बनवून विकला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गेल्या एक महिन्यापासून या परिसरात २४ तास नाकाबंदी लावण्यात आली होती.

२३ जुलै रोजी सत्रासेन नाक्यावर नाकाबंदी ड्युटीवर असलेल्या पोकॉ रावसाहेब एकनाथ पाटील आणि पोकाँ घनश्याम हिम्मत पाटील यांना उमर्टी नाक्याकडून सत्रासेन बाजुकडे एक मोटारसायकल वेगात येताना दिसली. त्यांनी तात्काळ बॅरिकेड लावले असता मोटारसायकल चालकाने गाडी वळवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोकॉ रावसाहेब पाटील यांनी शिताफीने त्याला पकडले. त्यावेळी तो मोटारसायकलसह खाली पडला.

मोटारसायकल चालवणारा आरोपी मंथन मोहन गायकवाड (वय २२, रा. वडाळा, ता. वाशी, जि. सोलापूर; ह.मु. हडपसर, पुणे) याच्या बॅगेत ३ अग्नीशस्त्र आणि ६ जिवंत काडतुसे, तर मागे बसलेला आरोपी स्वप्निल विभीषण कोकाटे (वय ३२, रा. रुई, ता. वाशी, जि. धाराशिव) याच्या ताब्यात १ पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे मिळून आली.

पोकॉ रावसाहेब पाटील यांनी ही माहिती कळवल्यानंतर पो.नि. अनिल भवारी, श्रेणी पोउपनि बापू साळुंके, पोकॉ चेतन महाजन, पोकॉ विशाल पाटील आणि इतरांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचानाम्याद्वारे ही सर्व अग्नीशस्त्रे आणि काडतुसे जप्त करण्यात आली.

अटक आरोपी मंथन मोहन गायकवाड आणि स्वप्निल विभीषण कोकाटे यांच्या चौकशीतून समोर आले की, त्यांचे साथीदार अप्पासाहेब गायकवाड (रा. गोजवड, ता. वाशी, जि. धाराशिव) आणि कानीफनाथ बहीरट (रा. बावा पेट्रोल पंप जवळ, संभाजीनगर) हे त्यांच्यासोबत होते. हे दोघे धुळे येथे थांबले होते आणि त्यांनी अग्नीशस्त्रे आणण्यासाठी कानिफनाथ बहीरटच्या मित्राची मोटारसायकल धुळे येथून घेऊन मदत केली होती. अटक आरोपी हे अग्नीशस्त्रे घेऊन फरार आरोपींना चारचाकी गाडीतून सुरक्षित वाहतूक करण्यासाठी देणार होते, अशी माहिती त्यांनी दिली.

अटक आरोपींनी उमटी येथील ‘पाजी’ नावाच्या शिकलकराने सदरची अग्नीशस्त्रे आणि काडतुसे ५० हजार रुपयांना विकल्याचे सांगितले. आरोपी मंथन गायकवाड याच्यावर यापूर्वीही अग्नीशस्त्र विक्रीचे गुन्हे दाखल आहेत. सदरची अग्नीशस्त्रे आरोपी कोणाला विकणार होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.


Protected Content

Play sound