Home Cities जळगाव आदिवासी आश्रमशाळांच्या विकासाबाबत आढावा बैठक; जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

आदिवासी आश्रमशाळांच्या विकासाबाबत आढावा बैठक; जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पुरेशा आणि दर्जेदार सुविधा मिळाव्यात या उद्देशाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली आज एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. विद्यार्थ्यांचे निवास, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधा अधिक चांगल्या दर्जाच्या व्हाव्यात, यावर या बैठकीत भर देण्यात आला.

या बैठकीत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये आश्रमशाळांतील वसतीगृहांची स्वच्छता, शिस्त आणि देखभाल यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, विद्यार्थ्यांच्या नियमित आरोग्य तपासण्या व वैद्यकीय सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण व शैक्षणिक साधनांची उपलब्धता, पोषणयुक्त भोजन व्यवस्था, स्वयंपाकगृहांची स्वच्छता, पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छतागृह व अन्य मूलभूत सुविधा या विषयांवर भर देण्यात आला.

विद्यार्थ्यांची उपस्थिती, त्यांचा शैक्षणिक कार्यक्रमांमधील सहभाग आणि त्यांची शैक्षणिक प्रगती यावर सातत्याने लक्ष ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिल्या. काही आश्रमशाळांमध्ये दिसून आलेल्या समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी संबंधित विभागांनी कारवाई आराखडा सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

या बैठकीस एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, यावल, शिक्षण विभागाचे प्रतिनिधी, अन्न व औषध प्रशासन, तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना अधिक सुरक्षित, आरोग्यदायी आणि शिक्षणक्षम वातावरण मिळेल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला. जिल्हा प्रशासनाच्या या पुढाकारामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील, अशी अपेक्षा आहे.


Protected Content

Play sound