Home Cities जळगाव विद्यापीठात वृक्षारोपणाने नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात !

विद्यापीठात वृक्षारोपणाने नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात !

0
193


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रातर्फे विद्यापीठात वृक्षारोपण करून नवीन शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात करण्यात आली. या पर्यावरणपूरक उपक्रमातून निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यापीठाच्या परिसरात वड, पिंपळ, उंबर आणि आंबा यांसारख्या प्राणवायू देणाऱ्या १३ झाडांचे रोपण करण्यात आले. याप्रसंगी भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राचे संचालक प्रा. डॉ. म. सु. पगारे यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले की, “प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करावे. वृक्षांसारखा दातृत्वाचा गुणधर्म हा प्रत्येक मानवाने आत्मसात करायला हवा. त्यामुळेच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे संवर्धन आणि जतन करणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे.”

या कार्यक्रमाला वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिल डोंगरे, संगणकशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ. राकेश रामटेके, वित्त व लेखा अधिकारी सीए रवींद्र पाटील, नवसंशोधन, नवोपक्रम व साहचर्य मंडळाचे संचालक राजेश जवळेकर, मुंबई येथील विकास जाधव या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्र, विचारधारा प्रशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.


Protected Content

Play sound