Home क्राईम ब्रेकींग : पगार बिलासाठी मागितली लाच : झेडपीतील महिला अधिकारीला रंगेहात पकडले...

ब्रेकींग : पगार बिलासाठी मागितली लाच : झेडपीतील महिला अधिकारीला रंगेहात पकडले !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पगार बिलावर सही करून ते पुढे पाठवण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी माधुरी सुनील भागवत (वय ३८, रा. पिंप्राळा, जळगाव) यांना जळगाव एसीबीने रचून रंगेहाथ पकडले आहे. त्यांनी ५ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे जळगावातील शासकीय दिव्यांग संमिश्र केंद्र येथे भौतिक उपचार तज्ञ तथा प्रभारी अधीक्षक या पदावर कार्यरत आहेत. १४ जुलै २०२५ रोजी तक्रारदार हे जून महिन्याच्या पगार बिलाच्या कामासंदर्भात जिल्हा परिषद येथील जिल्हा दिव्यांग विभागात गेले होते. तेथे त्यांनी आलोसे माधुरी भागवत यांची भेट घेतली. त्यावेळी माधुरी भागवत यांनी तक्रारदारांच्या पगार बिलामध्ये कोणतीही त्रुटी न काढता त्यावर सह्या करून ते पुढे जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे पाठवण्यासाठी १२ हजार रुपये लाचेची मागणी केली.

तक्रारदारांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी २२ जुलै रोजी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली. या तक्रारीनुसार, २२ जुलै रोजी पडताळणी करण्यात आली असता, माधुरी भागवत यांनी १० हजार रुपये लाचेची मागणी करून, तडजोडीअंती प्रथम हप्ता म्हणून ५ हजार रुपये आणि उर्वरित ५ हजार रुपये इतर बिले निघाल्यावर देण्यास सांगितले. पंचासमक्ष लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले.

आलोसे यांच्या मागणीप्रमाणे २४ जुलै रोजी माधुरी भागवत यांनी तक्रारदारांकडून ५ हजार रुपये लाचेची रक्कम स्वतः पंचासमक्ष स्वीकारली. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले. सदर घटनेबाबत आलोसे माधुरी भागवत यांच्याविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांनी ही यशस्वी सापळा कारवाई केली. या पथकात पीएसआय सुरेश पाटील, पोहेकॉ शैला धनगर, पोकॉ प्रणेश ठाकूर आणि पोकॉ सचिन चाटे यांचा समावेश होता.


Protected Content

Play sound