जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आरोग्यवर्धिनी योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या योगशिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाची दखल घेण्याची मागणी करत महाराष्ट्र योगशिक्षक संघटनेने आज, बुधवार, २३ जुलै रोजी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. योगशिक्षकांचे रखडलेले मानधन त्वरित मिळावे आणि आरोग्यवर्धिनी योग केंद्रे पुन्हा सुरू करावीत, अशी प्रमुख मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, समाजाला आणि देशाला निरोगी बनवण्यासाठी योगसाधनेशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या वतीने योगशिक्षक संपूर्ण देशात योगाबाबत जनजागृती करत असून, समाजाला स्वस्थ आणि सुदृढ ठेवण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. मात्र, आजपर्यंत योगशिक्षकांच्या पदरी निराशाच पडली आहे.

आरोग्यवर्धिनीच्या माध्यमातून ग्रामीण तसेच निमशहरी भागांत योगसाधनेद्वारे सर्वसामान्य लोकांपर्यंत आरोग्य पोहोचवण्याचे कार्य योगशिक्षक अविरतपणे करत आहेत. हे कार्य ते एक सामाजिक वसा म्हणून स्वीकारत आहेत, किंबहुना स्वतःचा पैसा खर्च करून सेवा देत आहेत. असे असतानाही, योगशिक्षकांचे मानधन वेळेवर मिळत नाही आणि त्यांना स्थायी नियुक्तीही मिळत नाही, अशी खंत संघटनेने व्यक्त केली.
संघटनेने मागण्या केल्या आहेत यात : आरोग्यवर्धिनी योग केंद्रांमधील योग सत्रे १ एप्रिल रोजी पासून बंद करण्यात आली आहेत, ती त्वरित पुन्हा सुरू करावीत. योगशिक्षकांचे मागील ४ महिन्यांपासून रखडलेले मानधन त्वरित देण्यात यावे. महाराष्ट्रात स्वतंत्र योग आयोग स्थापन करण्यात यावा. यांचा समावेश आहे.
या निवेदनावर संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख सुनील गुरव, जिल्हाध्यक्ष चित्रा महाजन, जिल्हा उपाध्यक्ष शरयू विसपूते, जिल्हा महासचिव पांडुरंग सोनवणे, जिल्हा कोषाध्यक्ष नूतन जोशी यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या मागण्यांवर शासनाने तातडीने लक्ष देऊन योगशिक्षकांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



