Home क्राईम डोक्यात बिअरची बाटली टाकल्याने प्रौढ गंभीर जखमी; हल्लेखोर पसार !

डोक्यात बिअरची बाटली टाकल्याने प्रौढ गंभीर जखमी; हल्लेखोर पसार !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बी.जे.मार्केट परिसरात काहीही कारण नसताना एका हॉटेलात काम करणाऱ्या व्यक्तीवर दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला आहे. हल्लेखोरांनी हातातील बियरची काचेची बाटली डोक्यात टाकून तसेच दगडाने मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी २० जुलै रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. जखमी व्यक्तीला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सोमवारी २१ जुलै रोजी रात्री ११ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दुचाकीवरील तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय सुपडू मालचे (वय ५०, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) हे शहरातील एका हॉटेलमध्ये रूम सर्व्हिस म्हणून कामाला आहेत. रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास ते बी.जे. मार्केट परिसरातून आपल्या घराकडे पायी जात होते. त्याचवेळी एका दुचाकीवर तीन अज्ञात व्यक्ती त्यांच्यासमोर आले. काहीही कारण नसताना त्यातील एकाने संजय मालचे यांच्या डोक्यात हातातील काचेची बियरची बाटली टाकून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर, रस्त्यावर पडलेल्या दगडानेही त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. हल्लेखोरांनी अंधाराचा फायदा घेऊन तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला.

या गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या संजय मालचे यांना नजीकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. संजय मालचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात तीन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास सपोनि संतोष चव्हाण हे करत आहेत. या विनाकारण झालेल्या हल्ल्यामुळे बी.जे.मार्केट परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


Protected Content

Play sound