Home क्राईम मोठी बातमी : आठ किलो गांजासह दोन आरोपी जेरबंद; एलसीबीची धडक कारवाई!

मोठी बातमी : आठ किलो गांजासह दोन आरोपी जेरबंद; एलसीबीची धडक कारवाई!


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या तस्करी आणि सेवनावर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (२० जुलै) रात्री केलेल्या धडक कारवाईत ८ किलो १३० ग्रॅम वजनाचा गांजा आणि इतर मुद्देमालासह दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे २ लाख ६२ हजार रुपये आहे. पोलीस मुख्यालयातील जनसंपर्क विभागाने सोमवारी (२१ जुलै) सायंकाळी ५ वाजता प्रसिद्धी पत्रकातून ही माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ८.३० वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, दोन संशयित आरोपी दुचाकीवरून (एमएच १८ बीडब्ल्यू ८०३५) प्रतिबंधित गांजाची अवैधपणे वाहतूक करत आहेत. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी तात्काळ चोपडा तालुक्यातील गलंगी गावाजवळ सापळा रचला.

पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान संशयास्पद वाटणाऱ्या दुचाकीवरील दोघांना अडवून त्यांची तपासणी केली. त्यावेळी त्यांच्याजवळ असलेल्या एका पोत्यात ८ किलो १३० ग्रॅम गांजा (अंदाजे किंमत १ लाख ६३ हजार रुपये) आढळून आला. पोलिसांनी याबाबत विचारपूस केली असता, आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे उदयभान संजय पाटील (वय २१) आणि योगेश रामचंद्र महाजन (वय २१) अशी असून, हे दोघेही अडावद, तालुका चोपडा येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून गांजा, दुचाकी (किंमत सुमारे १ लाख २२ हजार रुपये) आणि दोन मोबाईल असा एकूण २ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी पोलीस सक्रिय झाले असून, या कारवाईमुळे अवैध धंद्यांना चाप बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound