जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात गाडीवर बसण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरूणाला चौघांनी मारहाण करत गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी २० जुलै रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याबाबत रात्री ९ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात कल्पेश संजय आरखे वय १८ हा तरूण आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. रविवारी २० जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास कल्पेशच्या गाडीवर अरबाज हा बसलेला होता. त्यावेळी कल्पेशने गाडीवरून उतरविण्याचे सांगितले. या वरून दोघांमध्ये वाद झाला. थोड्या वेळाने अरबाज यांच्यासह त्याचे मित्र साहिल मुल्तानी, फरदीन आणि आर्शीया (सर्वांचे पुर्ण नाव माहित नाही) यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी कल्पेशचा मित्र रोहन जाधव हा भांडण सोडविण्यासाठी आला असता त्याला देखील मारहाण करण्यात आली. याप्रकरणी कल्पेश आरखे याने दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रकाश जाधव हे करीत आहे.




