यावल -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील शालेय क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी आणि नियोजनासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवार, दिनांक १८ जुलै रोजी यावल पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी कार्यालयात पार पडली. ही बैठक जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय आणि यावल पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. बैठकीस गटशिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके यांचे मार्गदर्शन लाभले, तर तालुका क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष व मुख्याध्यापक के. यु. पाटील यांनी अध्यक्षस्थानी भूमिका बजावली.
या बैठकीत यावल तालुक्यातील शाळांमधून आलेल्या क्रीडा शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. यामध्ये दहिगाव जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख विजय ठाकुर आणि डॉ. प्रमोद मुरलीधर सोनार यांनी विशेष उपस्थीती दर्शवली. तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन, स्पर्धेचे वेळापत्रक, सहभागासाठी आवश्यक क्रीडा शुल्क तसेच स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन प्रवेशिका भरावयाच्या प्रक्रियेची सविस्तर माहिती क्रीडा संयोजक दिलीप संगेले यांनी दिली.

बैठकीत प्रत्येक शाळेतील क्रीडा शिक्षकांनी आपापल्या शाळेतील विद्यार्थ्यांची तयारी करून संघासह स्पर्धेमध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन केंद्रप्रमुख विजय ठाकूर व डॉ. सोनार यांनी केले. यावेळी विविध शासकीय योजनांबाबतही शिक्षकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत वाय. वाय. पाटील, समर्थ रघुनाथ बाबा विद्यालय, चुचांळे यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल सर्व क्रीडा शिक्षक व समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षक के. आर. सोनवणे, आर. आय. तडवी, चिमणकारे सर, शे. सलीम सर, शे. कुरेशी शरीफ, शेख वसीम खान, अबु सुफियान, शे. अख्तर शे. युसुफ, पी. पी. महाजन, जे. ए. फिरके, योगेश कोळी, एन. सी. पाटील, ए. डी. पाटील, शे. जुबेर सर, सौ. डी. डी. ठाकरे, श्रीमती आर. एम. पाटील व इतर सर्व शाळेतील क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीच्या माध्यमातून तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे नियोजन शिस्तबद्धपणे करण्यात आले असून, शालेय विद्यार्थ्यांना खेळांमध्ये सहभागासाठी भक्कम व्यासपीठ मिळण्यास मदत होणार आहे.



