जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय प्रबंध समितीची दोन दिवसीय महत्त्वपूर्ण बैठक १९ आणि २० जुलै जी जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. हिंदू समाजासमोर सध्या असलेल्या विविध आव्हानांवर सखोल विचारमंथन करून, आगामी काळातील अभियानांची आणि कार्याची रूपरेषा या बैठकीत निश्चित केली जाईल, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री बजरंग बागडा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत…
श्री. बागडा यांनी यावेळी परिषदेच्या प्रमुख उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, हिंदू समाजाची अस्मिता जपण्यासाठी अवैध धर्मांतरण रोखण्याचे आमचे अभियान अविरत सुरू आहे. या दिशेने बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी देशभरात व्यापक जनजागृती करत आहेत. यासोबतच, गोरक्षा आणि कन्या सुरक्षा हे परिषदेच्या प्राथमिकतांमध्ये पूर्वीपासूनच समाविष्ट आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नशा मुक्ति अभियानावर विशेष भर:
युवा वर्गामध्ये वेगाने वाढत असलेली व्यसनाधीनता ही गंभीर चिंतेची बाब आहे. या आव्हानाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी बैठकीत राष्ट्रव्यापी नशा मुक्ति अभियानाची सविस्तर योजना आखली जाईल. या विशेष अभियानाचे नेतृत्व विश्व हिंदू परिषदेचे युवा संघटन, म्हणजेच बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी करणार आहेत. या अंतर्गत शाळा, महाविद्यालये आणि समाजाच्या विविध स्तरांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जातील. तसेच, हे अभियान प्रभावी करण्यासाठी समाज, विविध संघटना, गट आणि शासनासोबत समन्वय कसा वाढवायचा, यावरही बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील.
मंदिरांच्या सरकारी नियंत्रणाबाबत भूमिका:
आजही देशातील अनेक मोठ्या मंदिरांवर सरकारचे नियंत्रण आहे. मंदिरातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर केवळ हिंदू समाजाच्या हितासाठीच व्हावा, असे परिषदेचे ठाम मत आहे. मंदिरांचे व्यवस्थापन हिंदूंनीच करावे, यावर परिषदेचा विशेष भर आहे. या बैठकीत या विषयावर ठोस रणनीती तयार केली जाईल. गरज भासल्यास मुख्यमंत्री आणि आमदारांशी थेट संवाद साधला जाईल, तसेच जनजागरण अभियान, संमेलने आणि जनसभा आयोजित केल्या जातील, असेही श्री. बागडा यांनी सांगितले. या बैठकीतून हिंदू समाजाच्या विविध प्रश्नांवर परिषदेची पुढील भूमिका स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे.



